मुंबई :- पालघर जिल्ह्यातील डोंगराळ आणि अतिदुर्गम भागात असलेल्या रस्त्यांची सुधारण करण्यात येऊन रस्ते चांगल्या दर्जाची करण्यात येतील. दाभेरी ते बोपदरी या राज्य मार्गावर २.९ किलोमीटर आंतराच्या रस्ता सुधारणा कामास कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. तसेच दाभेरी – राहूळ – सागपाणी या प्रमुख जिल्हा मार्गाचे काम सुरू असून दोन्ही रस्ते मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येतील, असे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांबाबत सदस्य राजेंद्र गावित यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य जयंत पाटील यांनीही सहभाग घेतला.
मंत्री नाईक म्हणाले, दाभेरी ते डाळ या रस्त्यावर राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा सुरू आहे. ज्या मार्गांवर बस सेवा बंद आहे, त्या मार्गावर बससेवा सुरू करून जनतेची गैरसोय दूर होईल.
या चर्चेदरम्यानच्या उपप्रश्नाला उत्तर देताना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले, पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर होत आहे या बंदरामध्ये 26 टक्के वाटा राज्य शासनाचा आहे. बंदराच्या निर्मितीनंतर भारत जगात मोठी टर्मिनल क्षमता असलेल्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसणार आहे. त्यामुळे या भागातील पायाभूत सोयी- सुविधा निर्माण करण्यावर शासन भर देणार आहे.