– सोनिया साबळे दुसऱ्या तर विजया वाटाणे तिसऱ्या स्थानी
– शंखनाद न्यूज चॅनेलच्या वतीने विदर्भस्तरीय पाककला स्पर्धा यशस्वी
नागपूर :- महाराष्ट्र टेलिकम्युनिकेशन नागपूरद्वारा संचालित शंखनाद न्यूज चॅनेलच्या वतीने आयोजित विदर्भस्तरीय पाककला स्पर्धेत रितू जैन यांनी विजेतेपद मिळवून विदर्भाच्या नंबर वन शेफचा खिताब आपल्या नावे केला. स्पर्धेचे दुसरे बक्षीस सोनिया साबळे यांनी तर तिसरे स्थान विजया वाटाणे यांनी पटकावले. ही स्पर्धा २७ एप्रिल २०२४ रोजी संचेती ज्युनिअर कॉलेज, साईबाबा मंदिरासमोरील भागात, वर्धा रोड, नागपूर येथे पार पडली.
स्पर्धेत अनेक प्रतिभावान स्पर्धकांनी भाग घेतला आणि विविध प्रकारच्या चविष्ट पदार्थांची निर्मिती करून उपस्थिताना थक्क केले. स्पर्धकांना आपल्या घरून पदार्थ तयार करून आणण्यास सांगण्यात आले होते. एका निश्चित वेळेत पदार्थ टेबलवर सजवून आकर्षक मांडणी करण्यात आली. प्रसिद्ध शेफ आणि पाककला तज्ज्ञांच्या ज्युरी कमेटीने स्पर्धकांच्या पदार्थांचे मूल्यांकन केले. यात पदार्थाचे वैशिष्टय, स्वादिष्ट, आरोग्यात महत्व, आकर्षक सजावट आदी गोष्टी तपासण्यात आल्या. उपक्रमादरम्यान उत्साहपूर्ण वातावरण होते. प्रेक्षक स्पर्धकांना प्रोत्साहन देत होते आणि त्यांच्या कलाकृतींचा आनंद घेत होते.
स्पर्धेचा समारोप समारंभ एका भव्य कार्यक्रमाने झाला. ज्यामध्ये विजेत्यांची घोषणा करून पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ इकाॅनोमिक डेव्हलपमेंट काॅन्सिलच्या अध्यक्ष रीना सिन्हा, सीआरपीएफचे डीआयजी प्रशांत जांभुळकर, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या ज्यूरी लता टाक, कॅन्सर वॉरिअर, प्रसिद्ध शेफ नीता अंजनकर, शंखनाद न्यूज चॅनेलच्या संचालिका राखी कुहीकर, संचालक- संपादक सुनील कुहीकर उपस्थित होते.
या स्पर्धेचे परीक्षण पूनम राठी, रिझवाना दिवाण, शेफ विशाल चवरे, शेफ सुनील साखरकर, शेफ नीरज जैन, स्नेहल दाते यांनी केले.
विदर्भाच्या नंबर वन शेफचा खिताब विजेत्या रितू जैन यांनी मिळवला. त्यांना रेफ्रिजरेटर देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेच्या दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्या सोनिया साबळे यांना वॉशिंग मशीन, तर तृतीय बक्षीस विजया वाटाणे यांना वॉटर प्युरिफायर देण्यात आले. स्पर्धेच्या समारोप समारंभात एकूण स्पर्धकातील २५ जणांची शंखनादच्या खाद्ययात्रा मालिकेसाठी निवड करून त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू प्रदान करण्यात आले. यावेळी मंचावरील प्रमुख अतिथींनी विजेत्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
विविडच्या विधी सुगंध, जलतज्ज्ञ प्रवीण महाजन, लेखक संजय नाथे, निर्मल अर्बनचे सीईओ राजेंद्र बरडे, डॉ. मोहन अंजनकर, अजय सराफ, स्वप्नील अहिरकर , वाघमारे मसालेचे सारंग वाघमारे, मुकुंद पात्रीकर यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शंखनाद न्यूज चॅनेल द्वारे आयोजित ही स्पर्धा विदर्भातील पाककला प्रतिभेला प्रोत्साहन देण्याचा एक उत्तम प्रयत्न होता. या स्पर्धेमुळे अनेक नवोदित शेफना आपली कला जगाला दाखवण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली. स्पर्धेत विदर्भभरासह कोकणातील पनवेल येथूनही अनेक उत्कृष्ट शेफ सहभागी झाले होते आणि त्यांनी आपल्या पाककौशल्याचे दर्शन घडवून दिले.