नागपूर :- देशातील भाजप सरकारने दिल्लीपासून गल्लीपर्यंत प्रत्येक क्षेत्राचे खासगीकरण केले आहे. याच मालिकेत नागपुरातील नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, नागपूर मेट्रोसह अनेक नागरी सुविधा कार्यालयातील सेवांचे खासगीकरण केले आहे. त्यामुळे नागपुरातील तरुणांच्या हक्काचा रोजगार हिरावला गेला आहे. त्यामुळे तरुणाई यंदा भाजपला त्याची जागा दाखविल्याशिवाय राहणार नसल्याचा घणाघात इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांनी केला आहे. गुरुवारी सायंकाळी माध्यम प्रतिनिधीशी चर्चा करताना ते बोलत होते.पुढे ठाकरे म्हणाले, “नागपूर शहरात 24×7 पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी भाजपने ओसीडब्लू या खासगी कंपनीची नियुक्ती केली. यासाठी दरवर्षी कोट्यावधी रुपये या कंपनीला देण्यात येतात. दुसरीकडे नागरिकांनाही अव्वाच्या सव्वा दरात पाण्याचे बिल पाठविण्यात येत आहे. एकीकडे सेवा देण्यास अक्षम असलेल्या मनपाकडून नागरिकांकडून आर्थिक लुटही सुरु आहे. सेवा सुधरविण्यापेक्षा त्याचा दर्जा आणखी खालावला आहे. शहराची सिटी बस सेवा, कचरा संकलन असो वा मेट्रोमधील कर्मचाऱ्यांची नियुक्ती सर्व सेवा खासगी कंपन्यांच्या स्वाधीन केल्याचेही ठाकरे म्हणाले. या खासगीकरणाचा लाभ फक्त निवडक कंपन्यांनाच झाला आहे. त्यामुळे शहरातील शिक्षित असूनही बेरोजगार असलेला तरुण हा भाजपला कसा मतदान करणार? असा सावालही यावेळी त्यांनी उपस्थित केला.
*मुस्लिम बांधवांना दिल्या ईदच्या शुभेच्छा*
गुरुवारी ईद निमित्त विकास ठाकरे यांनी मोमीनपुरासह अनेक मुस्लिम बघून भागांत भेटी दिल्या. यावेळी मुस्लिम बांधवांशी संवाद साधून त्यांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या.
भर पावसातही कायम होता कार्यकर्त्यांचा जोशः जन आशीर्वाद यात्रेला दक्षिण-पश्चिममधूनही उदंड प्रतिसाद
गुरुवारी सकाळपासून पावसाला सुरवात झाली होती. तरी भर पावसातही मोठ्या संख्येत दक्षिण-पश्चिम नागपूरच्या नागरिकांनी मोठ्या उत्साहात विकास ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेचे स्वागत केले. आग्याराम देवी मंदिरापासून यात्रेची सुरुवात झाली. यानंतर शनिवारी-डालडा कंपनी-मोक्षधाम घाट-बोरकर नगर-रामेश्वरी-शताब्दी चौक-नरेंद्रनगर-बेसा रोड-मनीष नगर-वैशालीनगर मार्गे यात्रा चिंचभुवन पर्यंत निघाली. यावेळी मोठ्यासंख्येत काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यासोबतच सायंकाळी मध्य नागपुरातील बजेरिया येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत प्रामुख्याने माजी केंद्रीयमंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री डॉ. सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद यांची उपस्थिती होती.