यवतमाळ :- निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक पंचायत समिती, झरी जामणी येथे घेण्यात आली. झरी तालुका आयोगाच्यावतीने आकांक्षित तालुका म्हणून घोषित करण्यात आला असून या तालुक्यातील लोकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहे.
आढावा बैठकीस सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारकी सुहास गाडे, तहसिलदार अक्षय रासने, गटविकास अधिकारी रवींद्रकुमार सांगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन गेडाम, तालुका कृषी अधिकारी अमोल आमले, तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी प्रभाकर पांडे, गटशिक्षणाधिकारी गड्डमवार, उमेदचे तालुका मिशन व्यवस्थापक प्रदीप राठोड, आकांक्षित तालुका कार्यक्रम समन्वयक अनिल नरवाडे तसेच तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी 11 विभागांचा विशेष आढावा घेतला. त्यामध्ये आरोग्य, महिला व बाल विकास, शिक्षण, स्वच्छ भारत, कृषी आणि संलग्न सेवा, उमेद, पशुधन विकास, पंचायत, पाणी पुरवठा, भारत-भेट आदींचा समावेश आहे. यामध्ये संबंधित विभागांचा दर्शक निहाय माहिती त्यांनी घेतली.
आरोग्य विभागाने 21 पेक्षा कमी वय असणाऱ्या गरोदर मातांचे समुपदेशन करावे, असे सांगितले. माता आणि बालके यांचे नियमित वजन घेणे, टीबी रुग्णांची तपासणी करून त्यांचे मार्गदर्शन, माता प्रसुतीसाठी वाहतूकीची सुविधा, माता आणि बालके यांना पोषण आहार वाटप, कुपोषित बालकांचा दर कमी करणे तसेच प्रत्येक ग्रामपंचायतींनी त्यांच्या विकास आराखडामध्ये शाळा, अंगणवाडी आणि आरोग्य केंद्र यांना विद्युत पुरवठा, शौचालयाची व्यवस्था व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
शाळेतील विद्यार्थ्यांचा संक्रमण दर वाढवणे, स्थलांतरित विद्यार्थ्यांची नोंदणी करून त्यांना समावेशी शिक्षण प्रदान करणे, स्थानिक लोकांना शासकीय योजनेंतर्गत विहिरी, शेतकरी उत्पादक संघांना शासनामार्फत सहकार्य, उमेद मध्ये कुटुंबांना सहभागी करणे व त्यांना उत्पादक म्हणून समोर आणणे, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेंतर्गत पात्र नागरिकांना आवास उपलब्ध करून देणे तसेच प्रत्येक विभागाने वेळोवेळी माहिती आँनलाईन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
बैठकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी अडचणी समजून घेतल्या व त्याचे निवारण केले. प्रगत शेतकऱ्यांचे नावीन्यपूर्ण उपक्रम समजून घेतले आणि त्यांचे अभिनंदन केले. तसेच प्रत्येक विभागातील उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रशस्तिपत्र देऊन अभिनंदन केले. उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्याची प्रशंसा केली आणि आकांक्षित तालुका निती आयोगाच्या डेल्टा रँकिंगमध्ये सर्वोच्च असेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचलन अनिल नरवाडे यांनी केले.