नवी मुंबईत सर्वसुविधायुक्त महसूल भवन उभारणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा मुंबई, चेंबूर येथे शुभारंभ

मुंबई :- महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून हा विभाग अधिक सक्षम करण्यासाठी येत्या काळात प्रयत्न सुरु आहेत. याचदृष्टीने महसूल विभागासाठी महत्त्वपूर्ण आणि आवश्यक असे सर्वसुविधायुक्त भव्य महसूल भवन नवी मुंबईत उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी केली.

कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन 9 ते 11 डिसेंबर दरम्यान चेंबूर येथील राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझर मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धांचे उद्घाटन आज सकाळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, कोकण विभागाचे अपर आयुक्त किशन जावळे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुंबई जिल्हाधिकारी राजीव निवतकर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझरचे कार्यकारी संचालक अनिल माथूर, बार्कचे मुख्य वास्तुविशारद नागराज, पोलिस उपायुक्त अजय बन्सल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महसूल विभाग गतीमान करताना आपल्या अधिकारी आणि कर्मचारी यांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य असणार आहे. महसूल विभागासाठी महत्त्वपूर्ण आणि आवश्यक असे सर्वसुविधायुक्त महसूल भवन नवी मुंबईत उभारण्यात येणार असून यासंदर्भातील बैठक पुढील आठवड्यात नवी मुंबईत घेण्यात येईल, असे महसूल मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले. तसेच महसूल विभागासाठी येणाऱ्या काळात याबाबत त्या उपाययोजनांचा अभ्यास करुन त्याबाबतची अंमलबजावणी करण्यात येईल. कोरोना काळात महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी आरोग्य यंत्रणेसोबत काम करून सामान्य जनतेला दिलासा देण्याचे मोठे काम केले, असेही मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

कोविड महामारीमुळे महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या नव्हत्या. आता दोन वर्षांनी क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा आयोजन केल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांना आपले कला गुण दाखवण्याची संधी मिळाली. या स्पर्धांमुळे पुन्हा नव्याने चांगले काम करण्याची ऊर्जा मिळेल, असेही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

विभागीय आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी तीन दिवसीय स्पर्धेमध्ये कोकण विभागातून जवळपास 1600 अधिकारी आणि कर्मचारी सामील झाले असल्याचे सांगितले. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात खेळ संस्कृती रुजावी यासाठी दरवर्षी अशा स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याचे सांगितले.

कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा शुभारंभ महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करून तसेच क्रीडा ज्योत पेटवून करण्यात आला. यावेळी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात भाग घेणाऱ्यांना निरोगी खेळ खेळण्यासाठीची शपथ देण्यात आली. कोकण विभागाच्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदूर्ग अशा सात जिल्ह्याच्या क्रीडा पथकांनी यावेळी संचालन केले. या क्रीडा संचलनात पालघर जिल्ह्याला तृतीय, रायगड जिल्ह्याला द्वितीय आणि मुंबई उपनगर जिल्ह्याला प्रथम पुरस्कार मिळाला. तसेच यानंतर पार पडलेल्या 100 मीटर स्पर्धेतील विजेत्या पुरूष व महिला खेळाडूंना प्रशस्तीपत्र व पदक देऊन क्रीडा मंत्री यांच्या हस्ते गौरविण्यात आले. शुभारंभावेळी सांस्कृतिक फाऊंडेशनने सादर केलेल्या आय लव मुंबई या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘मुंबई उपनगर ग्रंथोत्सव’ चे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Sat Dec 10 , 2022
मुंबई :- मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० नुसार ‘ग्रंथोत्सव २०२२’ चे आयोजन करण्यात आले आहे या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते दि. १० डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. हा ग्रंथोत्सव वांद्रे पूर्व, शासकीय वसाहत, चेतना कॉलेज जवळ कम्युनिटी हॉल येथे होणार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com