– ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ परिवाराने मानले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे आभार
मुंबई :- देशभरातील पत्रकारांच्या समस्यांकडे लक्ष वेधून त्या शासनदरबारी मांडणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या रेट्यामुळे शासनाने राज्यातील सेवानिवृत्त पत्रकारांच्या मानधनात दुपटीने वाढ केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने यासंदर्भात आवाज उठवला होता. अखेर आज शासनाने याबद्दलचा जीआर काढून हा विषय मार्गी लागला, असे सांगितले आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ला मिळालेल्या यशाबदल राज्यभरातल्या अनेक जिल्ह्यांच्या ठिकाणी पेढे वाटून, फटाके फोडून पदाधिकारी, पत्रकार यांनी आनंद व्यक्त केला आहे.
देश-विदेशात क्रमांक एकची पत्रकार संघटना असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने सेवानिवृत्त पत्रकारांचा मानधन वाढीबाबतचा विषय शासनाकडे रेटून धरला होता. नुकतेच झालेले हिवाळी अधिवेशन, त्या अगोदर तीन वेळा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या वतीने धरणे आंदोलन केल्यानंतर शासनाने पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन एक समिती स्थापन केली होती. यावेळी संघटनेने पत्रकारांच्या आरोग्य, मुलांचे शिक्षण, निवासाचा प्रश्न, निवृत्ती वेतनाचा प्रश्न यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक तोडगा काढण्याची मागणी केली होती. पत्रकारांच्या आरोग्य योजनेत देखील भरीव वाढ करण्याची मागणी केली होती. संघटनेच्या यापूर्वी करण्यात आलेल्या विविध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सातत्याने संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस, माहिती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या भेटी घेऊन त्यांना राज्यातील पत्रकारांच्या समस्यांबाबत सांगितले होते. बारामती येथे सुमारे दोन हजार पत्रकारांच्या उपस्थितीत अधिवेशन घेण्यात आले. यावेळी देखील मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनातील मुद्द्यांवर आधारित आपल्या मागण्या शासनाकडे पाठवा, त्यावर गांभीर्याने विचार केला जाईल, असे आश्वासन दिले होते. ज्येष्ठ पत्रकारांना सामाजिक सुरक्षा, सुविधा देण्याच्या दृष्टीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना अंतर्गत शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सव पत्रकार कल्याण निधीमधील ठेवीवरील व्याजाच्या रकमेतून दरमहा 11 हजार रुपये एवढे अर्थसाहाय्य पात्र ज्येष्ठ पत्रकारांना देण्यात येत होते. यावर विधान परिषदेत व्हॉईस ऑफ मीडियाचा आवाज आमदार धीरज लिंगाडे यांनी बुलंद केला होता. शासनाचे लक्ष वेधले होते. दहा मार्च रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार अधिस्वीकृती धारक पात्र ज्येष्ठ पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेअंतर्गत दिले जाणारे अकरा हजार रुपयांचे अर्थसाहाय्य वीस हजारांपर्यंत वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या समितीने शिफारस करून हा सकारात्मक निर्णय पुढे आला आहे. हा व्हॉईस ऑफ मीडियाने दिलेल्या लढ्याचे यश आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयाबद्दल व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी दूरध्वनीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.