पत्रकार सुमेध वाघमारे, डॉ. धर्मपाल बौध्द, डॉ. अनिल सुर्या, ज्ञानेश्वर रक्षक, माया राठोड, डॉ. वैभव अग्रवाल आणि प्यारे खान राष्ट्रीय मानवाधिकार पुरस्काराने सन्मानित
नागपूर :- समाजातील गोरगरीब, पीडित आणि अंतिम घटकातील प्रत्येक व्यक्तीला मानवाधिकाराविषयी जागरूक करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी प्रत्येकाकडून निभावली जावी, अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केली.
मागील 22 वर्षापासून मानव अधिकार क्षेत्रात कार्यरत राष्ट्रीय मानवाधिकार संस्थेच्या वतीने राष्ट्रीय मानवाधिकार दिनाच्या अनुषंगाने मानवाधिकार क्षेत्रात दखलपात्र कामगिरी करणा-या मान्यवरांना रविवारी (ता.11) राष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळयाचे मुख्य अतिथी म्हणून डॉ. नितीन राऊत बोलत होते.
सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लब येथे आयोजित पुरस्कार समारंभाला विशेष अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निवृत्त न्यायमूर्ती रवी देशपांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ लॉ चे संचालक तथा प्राचार्य डॉ. एस.एम. राजन यांनी भूषविले. मंचावर समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, डॉ. अनमोल टेम्भूर्णे, मनीष भाला, संघटनेचे कर्नाटक शाखा अध्यक्ष प्रदीप झवर, डॉ. टी.एस. पठाण आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. नितीन राऊत यांनी देशात विपरीत परिस्थिती असताना मानवाधिकाराचे कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करीत असल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. त्यांनी देशात वेगवेगळ्या स्तरावर मानवाधिकाराचे हनन होत असल्याची बाब चिंताजनक असल्याचे सांगितले. आज देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. मात्र दुसरीकडे लग्नात घोड्यावरून वरात काढली म्हणून कुणा तरुणाला अमानुष मारहाण करण्यात येते, कुठे गरीब आदिवासी भगिनींवर अत्याचार करून हत्या केली जाते, वेगवेगळे कारण पुढे करून सातत्याने ‘मॉब लिंचिंग’ होत आहे. अशात केंद्रातील मंत्रिमंडळातील कुणी एक माजी मंत्री सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून सामाजिक वातावरण गढूळ करण्याचे काम करतो. या सर्व बाबी मानवाधिकाराचे हनन करणाऱ्या असून चिंताजनक आहे. अशा विपरीत परिस्थितीत मानवाधिकाराचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने माणसांनी पुढे येणे आणि त्यांचा संघटनेने गौरव करणे ही बाब अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संस्थेच्या वतीने मानवाधिकार क्षेत्रात दखलपात्र कामगिरी करणारे ज्येष्ठ पत्रकार दैनिक लोकमतचे उपसंपादक सुमेध वाघमारे, उस्मानिया विद्यापीठ हैदराबादचे राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. धर्मपाल बौध्द, लेखक, कवी व आंबेडकरी विचारवंत, नवी दिल्ली डॉ. अनिल सुर्या, तत्व चिंतक व समाजसेवक तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पीटलचे संचालक ज्ञानेश्वर रक्षक, मध्यप्रदेश येथील सामाजिक कार्यकर्त्या माया राठोड, वोकार्ड हास्पीटल नागपूर येथील डॉ. वैभव अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते प्यारे खान यांना मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
समारंभाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निवृत्त न्यायमूर्ती रवी देशपांडे यांनी मानवाधिकारीची कायदेशीर बाजू विशद केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ लॉ चे संचालक तथा प्राचार्य डॉ. एस.एम. राजन यांनी अध्यक्षीय भाषणातून समारंभाच्या आयोजनाचे कौतुक करीत सर्व सत्कारमूर्तींचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेखर जनबंधू यांनी केले. संचालन संघटनेचे उपाध्यक्ष अशोक कोल्हटकर यांनी केले तर आभार डॉ. अनमोल टेम्भूर्ने यांनी मानले. प्रदीप त्रिवेदी, दिलीप बाबरिया यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पमिता कोल्हटकर, शेखर जनबंधू, दीपक रेखी, अनिल शेंडे, करूणा टेम्भूर्णे, कविता पाल, जितेंद्र कोल्हे, सुनंदा कोचे, अल्का लाडे, दीप्ती नाईक, छाया खोब्रागडे, अशोक जांभुळकर, ऍड.डी.के. सोनी, ऍड. संतोष कुलकर्णी, मुक्तार अहमद, विजय अग्रवाल, डॉ. अर्चना सुखदेवे आदींनी सहकार्य केले.