मराठा समाजाला आरक्षण; महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून निर्णयाचे स्वागत

मुंबई :- मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याचे विधेयक विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून एकमताने संमत करण्याचा राज्यातील महायुती सरकारने आज ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. या ऐतिहासिक निर्णयाचे मी स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

एक्स या समाज माध्यमावर बावनकुळे यांनी म्हटले आहे की, आजचा हा निर्णय अंत्योदयाला न्याय मिळवून देणारा आहे. गेली काही वर्षे राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दलची आग्रही मागणी सरकारने मोठ्या आत्मीयतेने पूर्ण केली.मराठा समाजाला आरक्षण जरूर द्यावे, मात्र ते देताना सरकारने ओबीसी व इतर कोणत्याही समाजावर अन्याय करू नये ही आमची मागणी होती. त्या मागणीचा सन्मान सरकारने ठेवला, ही अत्यंत समाधानाची बाब आहे.

सरकारने गेल्या चार महिन्यात अतिशय पारदर्शी व प्रामाणिक प्रयत्न यासाठी केले. सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. न्या. सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्ग आयोग नेमला. महसूल विभागाकडून अतिशय शास्त्रीय राज्यव्यापी सर्वेक्षण केले. अखेर, आज शेवट गोड झाला. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण महायुती सरकारने बहाल केले.

आजचा दिवस खूप मोलाचा आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणे, हेच लोककल्याणकारी सरकारचे प्रथम कर्तव्य असते, ते आज या सरकारने सिद्ध केले. पूर्वीच्या त्रुटी दूर करून न्यायालयाने आखून दिलेल्या मर्यादेबाहेर जाऊन आरक्षण दिले.बहुजन हिताय असा नारा बुलंद करत आरक्षणाची तटबंदी अधिक मजबूत केली.

असे धाडसी निर्णय घेण्यासाठी विलक्षण राजकीय इच्छाशक्ती असावी लागते.सरकार जनतेचे असावे लागते, ते आज बावन्नकशी उजळून निघाले. कायद्याच्या चौकटीत राहून व कसोटीवर घासून सरकारने सामाजिक उन्नतीचा मार्ग प्रशस्त केला. सर्वच विरोधी पक्ष नेत्यांनी या विधेयकाला एकमताने पाठिंबा दिला, त्याबद्दल मी विरोधी पक्षांच्या नेत्यांचे मनापासून आभार मानतो.

जय जिजाऊ, जय शिवराय

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले - ॲड. नंदा पराते

Wed Feb 21 , 2024
नागपूर :- नागपुरातील टिमकी -भानखेडा भागात पिल्लुपाण्डु मंदिर पटांगणात छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम मोठया उत्साहात महिलांनी संपन्न केली. या जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस ॲड. नंदा पराते ह्या होत्या तर प्रमुख उपस्थिती म्हणून कल्पना अड्याळकर ,माया धार्मिक ,शकुंतला वट्टीघरे होत्या. त प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस ॲड. नंदा पराते म्हणाल्या भारताच्या इतिहासात राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com