नागपूर :- राज्यात सन २०१४ पासून वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान शिक्षण अभ्यासक्रम (पॅरामेडिकल) उत्तीर्ण असलेल्या ज्या विद्यार्थ्यानी नोंदणीसाठी अर्ज केले आहेत, त्यांची नोंदणी करण्यात आली आहे. यासंदर्भात एकही तक्रार राज्य शासनाकडे प्राप्त झाली नसल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता.
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, राज्यात सन २०१४ पासून वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान शिक्षण अभ्यासक्रम सुरू झाला असला तरी त्याची नोंदणी करण्यास सन २०१९ पासून सुरुवात झाली. नोंदणीसाठी २०१४ पासून अर्ज केलेल्या ५४३३ विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांची महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलने अद्याप नोंदणी केली नाही आणि नोंदणी अभावी विद्यार्थी बेरोजगार झाले असल्याच्या म्हणण्यात तथ्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी सदस्य राजेश टोपे, शेखर निकम, ॲड. यशोमती ठाकूर यांनी उपप्रश्न विचारले.