Ø पालकमंत्र्यांच्या सूचनेवरून अर्जांची स्वीकृती
Ø जिल्हाधिकारी, सीईओंचा जलद नोंदणीवर भर
Ø ग्रामीण भागात नोंदणीला महिलांचा उत्तम प्रतिसाद
यवतमाळ :- राज्य शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेचा अधिकाधिक महिलांना लाभ मिळावा व त्यांची नोंदणी गतीने व्हावी, यासाठी ग्रामसभेत महिलांचे अर्ज भरून घेण्याच्या सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या होत्या. त्याप्रमाणे जिल्ह्यात तीन दिवस झालेल्या या सभेत तब्बल 45 हजार महिलांची नोंदणी करण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. विहित मुदतीत महिलांची योजनेसाठी नोंदणी करण्याकरीता प्रशासनाच्यावतीने वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले जात आहे. प्रशासनाच्यावतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या प्राधान्यक्रम याद्या तयार करण्यासाठी दि.9 ते 11 जुलै दरम्यान गावपातळीवर ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत योजनेसाठी महिलांचे ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या होत्या.
पालकमंत्री व जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हाभर ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या या सभेत महिलांचे अर्ज मोठ्या प्रमाणावर स्वीकारण्यात आले. अर्ज स्वीकारण्यासाठी विशेष व्यवस्था सभेच्याठिकाणी करण्यात आली होती. त्यानुसार ग्रामीण भागात पक्त तीन दिवसाच्या कालावधीत तब्बल 45 हजार महिला लाभार्थ्यांची ऑफलाईन नोंदणी करण्यात आली आहे. ऑनलाईन पोर्टलवर सुमारे 8 हजार अर्ज भरण्यात आले आहे.
अंगणवाडी सेविकेकडून महिलांची नोंदणी
सद्याचे दिवस हे शेतीतील मशागतीचे दिवस आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला दिवसा शेतकामास जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे अंगणवाडी सेविका सायंकाळच्या वेळी महिला लाभार्थ्यांकडे जावून त्यांचे अर्ज भरून घेत आहे.
ॲपवर स्वत:च करा नोंदणी
शासनाने लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी ‘नारी शक्ती दूत’ अँप सुरु केले आहे. लाभार्थी महिला स्वत: देखील या मोबाईल अँपवरुन नोंदणी करु शकतात किंवा ऑफलाईन अर्ज भरुन आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात देऊ शकतात.
शहरी भागासाठी मुख्याधिकारी नोडल अधिकारी
शहरी भागात योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगरपरिषद, नगरपंचायतस्तरावर मुख्याधिकारी योजनेचे नोडल अधिकारी आहे. त्यानुसार नगर पालिका शाळा, अंगणवाडी केंद्र, शहर उपजिविका केंद्र इत्यादी ठिकाणी योजनेकरीता मदत केंद्र उभारण्याच्या सूचना नगरविकास विभागाने दिल्या आहे.
सोप्या पद्धतीने उघडा बँक खाते
ज्या लाभार्थ्यांकडे बँकेचे खाते नसेल त्यांना भारतीय डाक विभागाच्या पोस्ट पेमेंट बॅंकेचे आधार सीडेट बँक खाते अतिशय सोप्या पध्दतीने काढता येते. पोस्ट ऑफीस कार्यलयात किंवा किंवा आपल्या गावात येणाऱ्या पोस्टमनकडेही खाते काढता येतात. खाते उघडण्यासाठी फक्त आधार क्रमांक व मोबाईल सोबत आणावा लागतो. इतर कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. केवळ पाच मिनटामध्ये आधार सिडेट खाते काढता येते.
जन्म, अधिवास दाखल्याला पर्यायी पुरावे
शासनाने योजनेच्या अटीत बरीच शिथीलता आणली आहे. त्यानुसार उत्पन्नाच्या दाखल्या ऐवजी पिवळे, केशरी रेशनकार्ड स्वीकारल्या जाते. अधिवास प्रमाणपत्राऐवजी 15 वर्षापुर्वीचे रेशन कार्ड, मतदार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म प्रमाणपत्र स्वीकारले जात आहे. त्यामुळे दाखले काढण्याकरीता गर्दी करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.