– रस्ते खोदकामाबाबत आमदार विकास ठाकरे यांचा मनपा आयुक्तांना इशारा
– महानगरपालिकेला नागरिकांच्या जीवाशी खेळ करु देणार नाही
नागपूर :- शहरात गेल्या वर्षभरापासून नुकतेच तयार केलेले आणि अनेक सुस्थितीत असलेले रस्ते खोदून पाईपलाईन टाकण्यात येत आहे. दरम्यान रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कुठलीही उपाय योजना करण्यात येत नाही आहे. तसेच कंत्राटदार कंपनी खोदलेली माती, पाईप असा साहित्य रस्त्यावर सोडून पळ काढत असल्याने दररोज अपघात होत आहे. याकडे संबंधित मनपा अधिकारी कंत्राटदारासोबतच्या “अर्थ संबंधांमुळे” डोळेझाक करत आहे. म्हणून यंदा पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करुन रस्त्यांची दुर्दशा होत असताना कामचुकार करणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांकडून त्याचे दुरुस्तीची रक्कम वसूल करावी, तसेच या खोदलेल्या रस्त्यांमुळे पावसाळ्यात नागरिकांच्या जीवाशी खेळ करु देणार नाही, असा इशारा नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी पत्राद्वारे मनपा आयुक्तांना दिला आहे.
नागपूर महानगरपालिकेकडून दरवर्षी “स्टॅर्म वॉटर ड्रेनेज”वर कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येतात. मात्र थोडा जरी पाऊस आल्यास बर्डी सारख्या ठिकाणी बोट चालवून लोकांची मदत करावी लागत असल्याने मनपाच्या भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पडते. तरी मनपा प्रशासन काही सत्ताधारी नेत्यांशी हातमिळवणी करुन करोडेंचा घपला करत आहे. मात्र नागपूरकरांच्या घरात पावसाचे पाणी शिरत असून अपघातांमुळे दरवर्षी अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. तरी मनपा प्रशासन यावर आजपर्यंतही कुठलीही ठोस कारवाई करु शकला नाही. उलट नुकतेच तयार केलेले रस्ते खोदून पुन्हा नागपूरकरांच्या नशिबी खड्डेच आले आहे. या संदर्भात ठाकरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
रस्ते खोदकाम करताना “सेफ्टी बॉरिकेट” लावलेले नाही. यासोबतच खोदलेली माती रस्त्यावर तशीच सोडण्यात आली आहे. उदा. अभ्यंकरनगर रोड येथील व्हीएनआयटी ते श्रद्धानंद पेठ चौक, झिरो माईल मेट्रो स्टेशन ते रेल्वेस्टेशन कडे जाणारा मार्ग, झिरो माईल पासून झिरो माईल मेट्रो स्टेशन मार्ग, जुना व्हीसीए स्टेडिन ते मनपा मुख्यालय-विधानभवन चौक, इनर रिंग रोड नरेंद्रनगर चौक ते शताब्दी चौक अशी शेकडो उदाहरणे आहेत. या सर्व मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी तसेच यासाठी लागणारा खर्च संबंधीत मनपा अधिकाऱ्याकडून वसूल करण्यात यावा, अन्यथा मनपा अधिकाऱ्यांचे शहरात फिरणे अवघड होईल, तसेच नागरिकांना रोषाला या कामचुकारांना सामोरे जावे लागेल अशा इशाराही ठाकरे यांनी दिला आहे.
जी २० च्या निधीचाही दुरुपयोग
यापूर्वी नागपूरात आयोजित जी २० परिषदेसाठी महाराष्ट्र शासनाने २०० कोटींचा निधी मंजूर केला होता. यात तयार करण्यात येणारे रस्ते कुठल्याही कारणास्तव खोदण्यात येणार नाही अशी अट घालण्यात आली होती. मात्र आता याच निधीतून तयार करण्यात आलेले रस्ते पुन्हा खोदून शासनाच्या अटींचेही उल्लंघन मनपाकडून करण्यात येत आहे. या संदर्भातही ठाकरे यांनी ३ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती, तरी यावर आजपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आली नाही हे विशेष.
२०१६ मध्ये योजना मंजूर: ८ वर्षांनतर आली प्रशासनाला जाग
केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत शहरातील जलवाहिन्यांना २०१६मध्येच मंजूरी मिळाली होती. त्यानंतर शहरातील अनेक रस्त्यांचे डांबरीकरण आणि सिमेंटीकरण करण्यात आले. मात्र ज्या परिसरात पाईपलाईन टाकायची प्रस्तावित आले, त्याठिकाणी पाईपलाईन टाकल्यावर रस्ते निर्मिती केली असती तर नागरिकांच्या करस्वरुपी शासनाला दिलेल्या कोट्यावधी रुपयांची बचत झाली असती. तरी मनपा प्रशासनाने मर्जीतील कंत्राटदारांना लाभ पोचविण्यासाठी शासनाच्या निधीचा दुरुपयोग केला असल्याचे दिसून येत आहे.
खेळाच्या मैदानावर कंत्राटदाराचा ताबा
पाईपलाईनचे कंत्राट दिलेल्या कंपनीकडून तेलंगखेडी रामनगर येथील खेळाच्या मैदानावर अवैधपद्धतीने ताबा मिळवून सर्व बांधकाम साहित्य याठिकाणी ठेवण्यात आले आहे. याकडेही मनपाचे अधिकारी “अर्थपूर्ण दुर्लक्ष” करत असल्याचे दिसून येत आहे.