यवतमाळ :- जिल्ह्यातील सर्व पोस्ट ऑफिसद्वारे दिनांक 9 डिसेंबरपासून 31 डिसेंबर दरम्यान आरडी खाते घरोघरी ही विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना नियमित बचतीचे महत्त्व पटवून देणे आणि पोस्ट कार्यालयाच्या अल्प बचत योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे हा आहे.
मोहिमेदरम्यान पोस्ट ऑफिसचे कर्मचारी जिल्ह्यातील प्रत्येक भागात जाऊन आरडी खाती उघडण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणार आहे. पोस्टमन व ग्रामीण डाक सेवक कर्मचारी घरोघरी जाऊन बचत योजनांची माहिती देणार आहेत आणि खाते उघडण्याची प्रक्रिया सुलभ व वेगवान केली जाणार आहे. आरडी अर्थात आवर्ती ठेवी खाते ही योजना कमी रक्कमेत नियमित बचतीसाठी एक उत्तम पर्याय आहे. यामुळे भविष्यकाळासाठी आर्थिक स्थैर्य मिळवता येऊ शकते.
जिल्ह्यातील नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा आणि आपल्या कुटुंबासाठी सुरक्षित आर्थिक भविष्य सुनिश्चित करावे, असे आवाहन यवतमाळ विभागाचे डाकघय अधिक्षक गजेंद्र जाधव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या पोस्ट कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.