-अजनी डेपोत 5 कोटींचे सीएनसी यंत्र
-22 महिन्यांत एक कोटीची बचत
नागपूर :- रुळांशी सततच्या घर्षणाने विशिष्ट किमीनंतर रेल्वेच्या चाकांच्या आकारमानात बदल होतो. चाकांची क्षमताही कमी होते. अशा चाकांवर रेल्वे चालविणे धोक्याचे असते. यंत्राच्या माध्यमातून आकारमानात बदल झालेल्या चाकांना पूर्वस्थितीत आणले जाते. यंत्राच्या माध्यमातून 22 महिन्यांत 4 हजार 973 चाकांना मूळ स्वरूपात आणण्यात आले आहे.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने 5.8 कोटी रुपये खर्च करून कॉम्प्युटराईज्ड न्यूमरिकल कंट्रोल (सीएनसी) सरफेस व्हील लेथ हे यंत्र खरेदी केले असून, अजनीच्या आरओएच डेपोत बसविले आहे. रेल्वेगाडीच्या चाकांना आकार देणारे सीएनसी हे यंत्र नागपूर विभागात नव्हते. त्यामुळे घर्षण होऊन आकारात बदल झालेल्या चाकांना मूळ आकार देण्यासाठी येथून चाके भुसावळ, कुर्दवाडी आणि मोतीबाग कारखान्यांत पाठविले जायचे. याकामी महिन्याकाठी पावणेतीन लाखांचा खर्च (मालवाहतूक) येत असे. शिवाय 10 ते 15 दिवस प्रतीक्षा करावी लागायची. त्याचा प्रभाव इतर कामांवर व्हायचा.
सीएनसी हे यंत्र पूर्णपूणे संगणकीकृत आहे. या यंत्राच्या सॉफ्टवेअरमध्ये आधीच प्रोग्राम फिट केलेला आहे. केवळ कमांड देण्याचे काम तज्ज्ञ कर्मचारी करतात. व्हील प्रोफाईलचे काम संगणकीय स्क्रीनवर पाहता येते. हे यंत्र सतत 48 तास काम करू शकते. 8 तासांत 20 चाके पूर्ण करण्याची या यंत्राची क्षमता आहे. याच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम संबंधित कंपनीचे आहे. 7 वर्षांपर्यंत देखभाल कंपनीच करणार आहे. एकंदरीत कमी वेळात अधिक काम निघत असून मनुष्यबळही कमीच लागते. शिवाय दुसरीकडे दुरुस्तीसाठी नेण्यापोटी येणार्या खर्चात 22 महिन्यांत 1.9 कोटीची बचत झाली आहे.
खर्च आणि वेळेची बचत
सीएनसी यंत्रामुळे वेळेची बचत झाली आहे. पूर्वी हेच काम दुसर्या ठिकाणी करावे लागायचे. त्यावर होणारा खर्चही वाचला. आता वेळेच्या आत व्हील मिळत असल्याने कामाची गतीही वाढली आहे. सध्या मध्य रेल्वेचेच काम अजनी डेपोत होते. भविष्यात इतरही ठिकाणची कामे घेता येतील.
विजय थूल
वाणिज्य व्यवस्थापक (मध्य रेल्वे नागपूर)