राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी साहित्य, भजनातून समाजाला दिशा दिली – देवेंद्र फडणवीस

Ø राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे उद्घाटन

Ø संमेलनातून राष्ट्रसंतांचे साहित्य, भजने लोकांपर्यंत पोहचेल

Ø आजनसरातील 25 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार

वर्धा :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा काळ पारतंत्र्य, रुढी, परंपरा, अज्ञान, अंधश्रद्धेचा काळ होता. समाजात असमानता तर तरुणाई भरकटलेल्या अवस्थेत होती. अशा स्थितीत राष्ट्रसंतांनी तरुणांना भजनाद्वारे प्रबोधनातून मोहीत केले. संपूर्ण समाजाला दिशा देण्याचे काम त्यांनी केले, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

हिंगणघाट तालुक्यातील श्रीक्षेत्र आजनसरा येथे श्रीसंत भोजाजी महाराज देवस्थान व अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ, श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रमच्यावतीने आयोजित राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खा.रामदास तडस, आ.रामदास आंबटकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष आ.समीर कुणावार, आ.डॅा.अशोक उईके, आ.किर्तीकुमार भांगडीया, आ.संजिवरेड्डी बोदकुरवार, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधीक्षक नूरूल हसन, गुरुवर्य महंत सुरेश शरण शास्त्री महाराज, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, नितीन मडावी, अ.भा.श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी तथा संमेलनाध्यक्ष लक्ष्मण गमे, प्रचार प्रमुख प्रकाश महाराज वाघ, श्रीसंत भोजाजी महाराज देवस्थानचे अध्यक्ष डॅा.विजय पर्बत आदी उपस्थित होते.

विदर्भ ही संतांची मंदियाळी असलेली भूमी आहे. येथील तीन संतांनी फार मोठ्या प्रमाणावर प्रबोधनाचे काम केले. प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराजांनी आपल्या दिव्यदृष्टीतून मोठ्या प्रमाणावर प्रबोधनपर साहित्याची निर्मिती केली. संत गाडगेबाबांनी स्वच्छतेसोबतच जातीभेद, अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश दिला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अखिल भारतात जागृकता आणली. संपुर्ण विश्वात त्यांनी मानवतेचा विचार पोहोचविण्याचे काम केले. युवकांना त्यांनी संस्कार दिले. वाईट रुढी, परंपरा तोडल्या पाहिजे, गरिबांची, समाजाची सेवा हाच मोठा धर्म आहे, हे राष्ट्रसंतांनी समाजमणात रुजविले.

तुकडोजी महाराजांनी आपले साहित्य, भजनातून एक मोठी पिढी तयार केली. या पिढीने पुढे सशक्त समाज तयार करण्यात हातभार लावला. आम्ही पारतंत्र्यात रहायला तयार नाही, असे वातावरण त्यांनी आपल्या प्रबोधनातून तयार केले. त्यांनी स्वातंत्र्य संग्राम सेनानी म्हणून केलेले काम मोठे आहे. समाजाच्या समस्या व त्यावरील निराकरण त्यांच्या भजनात दिसून येते. भजनातून जनजागृतीसह चांगला विचार त्यांनी समाजाला दिला. राष्ट्रसंतांनी मराठी, हिंदीत 1200 भजने लिहली. ही भजने देशभरात प्रसिद्ध झालीत, असे पुढे बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राष्ट्रपती भवनात देखील तुकडोजी महाराजांच्या भजनाचा कार्यक्रम झाला. राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद त्यांच्या भजनाने प्रभावित झाले होते. त्यांनीच महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी दिली. राष्ट्रपतींद्वारे राष्ट्रसंत ही पदवी दिलेले तुकडोजी महाराज एकमेव संत आहे. जपानच्या परिषदेत तुकडोजी महाराजांनी उपस्थितांना मोहित केले होते. राष्ट्रसंतांचा विचार शाश्वत आहे, वाहत्या नदीसारखा त्यांचा विचार आहे. समाजाला अपेक्षित, आवश्यक आहे, ते देण्याचे काम त्यांच्या विचारातून झाले.

महाराजांनी समाजाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे ‘ग्रामगीता’ होय. प्रत्येकाला आपल्या कर्तव्याची जाणीव ग्रामगीता करुन देते. स्वयंपूर्ण गाव कसे तयार होईल, आपणच आपले शिल्पकार कसे होऊ शकू, हे ग्रामगीता सांगते. महाराजांचे विचार, साहित्य, भजने लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम या संमेलनातून होणार आहे.

श्रीसंत भोजाजी महाराज मंदिरात मोठ्या संख्येने भक्त येतात. मंदिरातील प्रसादाची पुरणपोळी समाधान देणारी आहे. आजनसरा परिसराच्या विकासाबाबत आश्वस्त करतो. विकासासाठी आराखडा मंजूर करुन घेऊ. बांधकाम व सर्व कामांचा पाठपुरावा करु. येथे करण्यात आलेल्या विविध मागण्या पुर्ण करण्यासाठी आपला प्रतिनिधी म्हणून मी काम करेल, असे फडणवीस यांनी सांगितले.

आजनसरा परिसरात 25 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. सन 2000 मध्ये भुमिपूजन झालेल्या आजनसरा बँरेजचे दोन महिन्यात टेंडर काढू. पाईप डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क पद्धतीने क्षेत्र लवकरच ओलिताखाली येणार असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे पिवळा मोझँकमुळे नुकसान झाले आहे. या नुकसानीची माहिती विमा कंपन्यांना देऊन तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश त्यांनी दिले. गेल्यावर्षी शेतकऱ्यांना 11 हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली. यावर्षी देखील नुकसानग्रस्तांना मदतीची भूमिका आहे. मोझरी आश्रम परिसरात राहिलेली कामे पुर्ण करु, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी खा.रामदास तडस यांनी सोयाबीन पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देणे आवश्यक असल्याचे सांगितले. श्रीसंत भोजाजी महाराज देवस्थानला ‘अ’ वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. आ.समीर कुणावार यांनी महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आजनसरा येथे प्रत्येक महिन्याला 12 ते 15 लाख भाविक येतात. या स्थळाच्या विकासासाठी विकास आराखडा केला जावा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे साहित्य घराघरात, मनामनात पोहोचले पाहिजे, असे सांगितले.

सुरुवातीस दिपप्रज्वलन करून उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी गुरुवर्य महंत सुरेश शरणजी शास्त्री महाराज, प्रकाश महाराज वाघ, श्रीसंत भोजाजी महाराज देवस्थानचे अध्यक्ष डॅा.विजय पर्बत यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन सचिन घोडे यांनी केले तर आभार अ.भा.श्रीगुरुदेव सेवामंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे यांनी मानले. उद्घाटन कार्यक्रमास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनानंतर विविध परिसंवाद घेण्यात आले.

संस्थानच्या विविध उपक्रमांचे भूमिपूजन

श्रीसंत भोजाजी महाराज देवस्थानच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ई-भूमिपूजन झाले. त्यात स्पर्धा परिक्षा अकादमी, मुक्तांगण बाग, कामधेनू गो-शाळा व ग्रामगीता भवनचा समावेश आहे.

श्रीसंत भोजाजी महाराजांचे दर्शन व आरती

आजनसरा येथे आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीसंत भोजाजी महाराज देवस्थानला भेट दिली. यावेळी त्यांनी भोजाजी महाराजांच्या मुर्तीचे दर्शन घेतले व आरती केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन

Tue Oct 3 , 2023
वर्धा :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला सुतमाला अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, तहसिलदार रमेश कोळपे आदी उपस्थित होते. राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी चौक येथून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अंध […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com