नागपूर :- सोमवारी (ता. २९) सायंकाळी आलेल्या वादळी पावसामुळे संपूर्ण शहरात विपरीत परिस्थिती निर्माण झाली. शहराच्या अनेक भागांमध्ये झाडे पडली, कुठे झाडांच्या फांद्या तुटून पडल्या त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली. अशा परिस्थितीतून मार्ग काढून नागरिकांना दिलासा मिळवून देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या विविध विभागाद्वारे सोमवारी रात्री उशीरापर्यंत मदतकार्य करण्यात आले व परिस्थितीत नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त रवींद्र भेलावे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, कार्यकारी अभियंता (विद्युत) अजय मानकर, प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे आणि सर्व सहायक आयुक्त यांनी वेगवेगळ्या भागांमधील परिस्थितीचा आढावा घेउन मनपाच्या चमूला अधिक वेगाने मदतकार्य करण्यास प्रोत्साहित केले.
सिव्हिल लाईन्स येथील मनपा मुख्यालयाजवळील जायका मोटर्स जवळ वाहनावर झाड पडले घटनेची माहिती मिळताच मुख्यालय चमूद्वारे तात्काळ झाड कापून बचावकार्य करण्यात आले. जिल्हा न्यायाजवळ झाडाची मोठी फांदी पडण्याची माहिती मिळताच चमूद्वारे येथेही बचाव कार्य करून पडलेले झाड बाजूला करण्यात आले. याशिवाय वर्धा मार्गावरील हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉईंट जवळील जी.एच. बिल्डिंग येथे तसेच जाफर नगर येथे, सोमलवाडा वर्धा रोड येथे आणि स्वावलंबी नगर या चारही ठिकाणी झाड पडल्याची माहिती मनपाच्या नियंत्रण कक्षाला नागरिकांमार्फत देण्यात आली. चारही ठिकाणी वेगवेळ्या चमूंनी पोहोचून तात्काळ नागरिकांना दिलासा मिळवून दिला.
जयताळा येथील प्रगती नगर राही इस्टेड येथे झाडाची मोठी फांदी तुटून पडली तर जय दुर्गा नगर धरमपेठ महिला बँक मनीष नगर, गायत्री नगर, मिलींद नगर हावरे लेआउट, मंगलदीप नगर मानेवाडा बेसा रोड या भागांमध्ये झाड पडले. अशोक कॉलनी बुद्ध विहार युनियन बँक जवळ फांदी पडली तर निकालस शाळेजवळ, मनीषनगर येथे तसेच वायुसेना रोड फुटाळा तलाव, आमकार नगर, जयताळा, मानेवाडा, कर्वे नगर, नरेंद्र नगर, पायोनिअर सोसायटी आदी भागांमध्ये देखील झाडांची पडझड झाल्याची माहिती नियंत्रण कक्षाला प्राप्त झाली. नियंत्रण कक्षाद्वारे तात्काळ संबंधित ठिकाणाच्या नजीक असलेल्या अग्निशमन पथकाला माहिती देउन
घटनास्थळी पाठविले. अग्निशमन पथकाद्वारे जलदगतीने बचावकार्य करून संबंधित परिसरातील नागरिकांना दिलासा मिळवून देण्यात आला.
शहरात निर्माण होणा-या आपात्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी मनपा सज्ज असून नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने विविध स्तरावर प्रयत्न सुद्धा सुरू आहेत. नागरिकांनी कोणत्याही स्थितीमध्ये सहकार्यासाठी मनपाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती द्यावी, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी नागरिकांना केले.
आपात्कालीन मदतीसाठी येथे संपर्क साधा
आपात्कालीन परिस्थितीत मदतीसाठी मनपा मुख्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष तैनात करण्यात आले आहे. नागरिकांनी सहकार्यासाठी आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात ०७१२ २५६७०२९, २५६७७७७, २५४०२९९, २५४०१८८ या क्रमांकांवर किंवा अग्निशमन केंद्राच्या १०१, १०८ आणि ७०३०९७२२०० या क्रमांकांवर संपर्क साधावा.