– १७ ते २१ फेब्रुवारी पर्यंत शिबिर : जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरिता रमाई घरकुल योजनेच्या झोनस्तरीय शिबिराचा सोमवारी (ता.१७) शुभारंभ झाला. नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोन कार्यालयांमध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आले असून शिबिराच्या मुख्य शुभारंभ समारंभ आशी नगर झोन कार्यालयामध्ये घेण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख, मनपाच्या मुख्य अभियंता लीना उपाध्ये, सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग सुकेशनी तेलगोटे, मनपा कार्यकारी अभियंता कमलेश चव्हाण, अजय पाझारे, उपअभियंता वैजंती आडे आदी उपस्थित होते.
समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख यांनी यावेळी रमाई घरकूल योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून जास्तीत जास्त नागरिकांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. मनपा मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्ये यांनी गोरगरीबांना हक्काचे घर मिळावे यासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या योजनेचा पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविणे तसेच योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नागपूर महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले. शहरात कोट्यवधीची विकास कामे सुरु असतानाच गोरगरीबांना अडीच लाख रुपयांच्या मदतीतून हक्काचे घर निर्माण करुन देणे आणि त्यातून त्यांचा स्वाभिमान उंचावणे ही आनंददायी बाब असल्याचेही त्या म्हणाल्या. सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग सुकेशनी तेलगोटे यांनी योजनेच्या अंमलबजावणीसाठी नागपूर महानगरपालिकेकडून मोठे सहकार्य मिळत असल्याचे यावेळी सांगितले. त्यांनी शिबिरामध्ये नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना कागदपत्रांकरिता योग्य मार्गदर्शन करण्याची सूचनाही त्यांनी शिबिराकरिता नियुक्त कर्मचा-यांना केली. कोणतेही अर्ज बाद होउ न व प्रत्येक लाभार्थ्याला योजनेचा लाभ मिळावा या दृष्टीने कार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
रमाई घरकूल योजना ही महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील अनुसुचीत जाती व नवबौध्द घटकासाठी आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना तीन टप्प्यांमध्ये २.५ लक्ष रुपये अनुदान दिले जाते. आतापर्यंत नागपूर शहरातील ५२७७ लाभार्थी योजनेसाठी मंजुर असून ५२७२ लाभार्थ्यांना प्रथम हप्ता आणि ४३८१ लाभार्थ्यांना द्वितीय हप्ता वितरीत करण्यात आलेला आहे व ३३७७ लाभार्थ्यांना तिसरा हप्ता देण्यात आला आहे. उर्वरीत १००४ लाभार्थ्यांच्या घराचे बांधकाम हे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
१. अर्जदाराचे जातीचे प्रमाणपत्र
२. अर्जदाराच्या नावाची घराची कर पावती
३. घर स्लममध्ये येत असल्यास स्लम सर्टिफिकेट
४. मालकीची जमीन असल्यास आखिव पत्रिका / मालमत्ता पत्रक
५. उत्पन्नाचे प्रमाणपत्र
६. विद्युत देयक
७. आधार कार्ड
८. निवडणूक मतदार ओळख पत्र
९. बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत
१०. घरकुल शपथपत्र १०० रु. स्टॅम्प पेपरवर
११. घराचा फोटो
अटी व शर्ती
· लाभार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा
· लाभार्थाचे उत्पन्न ३ लाखापेक्षा कमी असावे
· लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
· लाभार्थ्याचे घर हे कच्चे असावे
· लाभार्थीचे घर हे घोषित स्लम मध्ये किंवा स्वःमालकीचे जागेवर असावे.