वर्धा :- वर्धा जिल्ह्यातील रायपूर गावाने सौर ऊर्जेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. देवळी तालुक्यातील या गावाने 100 टक्के सौर ऊर्जेचा वापर करून जिल्ह्यातील तिसरे सौरग्राम होण्याचा मान मिळवला आहे. महावितरणच्या नागपूर परिमंडलांतर्गत चिचघाट राठी आणि नेरी (पुनर्वसन) पाठोपाठ या सौरग्रामच्या यादीत रायपूरचे नाव आता जोडले गेले आहे.
गावातील 18 घरगुती आणि 1 पथदिव्याच्या वीज जोडण्या आता पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणार आहेत, ज्यामुळे गावकऱ्यांचे वीज बिल शून्यावर येणार आहे. पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेचा लाभ घेत 16 घरांच्या छतावर प्रत्येकी 2 किलोवॅटचे स्वतंत्र सौर प्रकल्प बसविण्यात आले आहेत. तसेच, एका घरावर 1 किलोवॅटचा प्रकल्प आणि पथदिव्यांसाठी 1 किलोवॅट क्षमतेची विनाअनुदानित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पांमधून दरमहा सरासरी 5,100 युनिट सौर ऊर्जा निर्मिती होणार आहे.
रायपूरला 100 टक्के सौर गाव बनवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्रा, संचालक (संचालन) अरविंद भादीकर, संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांच्या मार्गदर्शनात प्रादेशिक संचालक परेश भागवत, कार्यकारी संचालक (विशेष प्रकल्प) धनंजय औंढेकर, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके आणि वर्धा मंडलाच्या अधीक्षक अभियंता स्मिता पारखी यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धा विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील गोतमारे, कार्यकारी अभियंता (प्रशासन) प्रदिप घोरुडे, देवळी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रेम तेलरांधे, सहाय्यक अभियंता मयूर हेडाऊ आणि जनमित्र संतोष आत्राम यांनी अथक परिश्रम घेतले.
या सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे रायपूर गावातील नागरिकांना केवळ आर्थिक फायदा होणार नाही, तर पर्यावरण संवर्धनातही रायपूरचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे.