– रेल्वे बोर्डाचा निर्णय, सीटीएसई योजना बंद, उम्मीद सुरू
नागपूर :- रेल्वेची कॅशलेश मेडीकल ट्रीटमेंट स्कीम इन इमरजन्सी (सीटीएसई) ही योजना बंद करण्यात आल्यामुळे निवृत्तीवेतन धारकात संभ्रम निर्माण झाला आहे. रेल्वे बोर्डाच्या नव्या आदेशामुळे कॅशलेश उपचार घेता येणार नाही, अशी भावना पेंशनधारकात आहे. मात्र, रेल्वेची उम्मीद (युएमआयडी) आणि आरईएलएचएस कार्ड योजना कायम असल्याने निवृत्तीधारकांना उपचार घेता येईल. पेंशनधारक आणि कर्मचार्यांना कॅशलेश उपचार घेण्यात कोणतीही अडचन येणार नाही.
भारतीय रेल्वेत कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना रेल्वे रूग्णालयाच्या पॅनलवर असलेल्या रूग्णालयात उपचार घेता यावा यासाठी विविध योजना असून तसे कार्ड देण्यात आले आहे. यात सीटीएसई, युएमआयडी आणि आरईएलएचएस योजनेचा समावेश आहे. यातही सीटीएसई कार्ड धारकांची संख्या बोटावर मोजण्याइतपत होती. रेल्वे बोर्डाने मेडीकल ट्रीटमेंट स्कीम इन इमरजन्सी ही योजना बंद केली आहे. 16 ऑक्टोबर 2023 ला अशा आशयाचे आदेश नागपुरातही धडकले. त्यामुळे कर्मचारी आणि पेंशनधारकात संभ्रम निर्माण झाला आहे.
पेेंशनधारकांनी गोंधळून जाण्याचे कारण नाही
कॅशलेश मेडीकल ट्रीटमेंट स्कीम इन इमरजन्सी (सीटीएसई) ही योजना बंद करण्यात आली. त्याच वेळी रेल्वे बोर्डाने उम्मीद (युएमआयडी) आणि आरईएलएचएस कार्ड योजना कायम ठेवली आहे. कारण हे दोन्ही कार्ड रेल्वेच्या सर्वच कर्मचार्यांकडे आहेत. त्यामुळे निवृत्ती वेतन धारक तसेच रेल्वे कर्मचार्यांनी गोंधळून जाण्याचे काहीच कारण नाही. त्यांना रेल्वे पॅनलवरील रूग्णालयात आधीसारखाच कॅशलेश उपचार घेता येणार आहे.
बासूदेव पात्रा, जनरल सेक्रेटरी, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे पेंशनर असोसिएशन
75 वर्षावरील पेंशनधारकांसाठीही सुविधा
वयाची 75 वर्ष पूर्ण झालेल्या पेेंशनधारकांना रेल्वे बोर्डाने चांगली सुविधा आणली आहे. अशा पेेंशनरधारकांना रेल्वे रूग्णालयाने रेफर न करताही स्वता जावून रेल्वे पॅनलवरील रूग्णालयात उपचार घेता येईल. रेल्वे बोर्डाच्या या निर्णयाचे पात्रा यांनी स्वागत केले आहे. सध्या ही सुविधा वर्षभरासाठी प्रायोगीक तत्वावर म्हणजे 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत लागू राहील. प्रतिसाद पाहिल्यानंतर ही योजना कायमस्वरुपी लागू करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.