– विद्यापीठात राष्ट्रसंत व्याख्यानमाला
नागपूर :- स्वातंत्र्यपूर्व काळातील नोबेल पुरस्कार प्राप्त साहित्यिक रवींद्रनाथ टागोर यांची राष्ट्रवादाची संकल्पना मानवतावादी होती, असे प्रतिपादन इंग्रजीचे माजी प्राध्यापक आणि संचालक, भाषा आणि संस्कृती विद्यालय, रवींद्र भारती विद्यापीठ कोलकाता येथील प्रा. सुबीर धार यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शताब्दी महोत्सवानिमित्त पदव्युत्तर इंग्रजी विभागाद्वारे राष्ट्रसंत व्याख्यानमालेचे आयोजन जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहातर सोमवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आले. यावेळी डॉ. धार बोलत होते. व्याख्यानमालेचे अध्यक्षस्थान प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी भूषविले तर मंचावर मानव विज्ञान विद्या शाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. संजय पवळेकर उपस्थित होते.
‘रवींद्रनाथ टागोर ऑन नॅशनॅलिझम ॲण्ड ह्युमॅनिजम’ या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. सुबीर धार यांनी भारतामध्ये साहित्य क्षेत्रातून राष्ट्रवादाची संकल्पना कशी विकसित झाली याची माहिती दिली. भारत आणि पाश्चिमात्य साहित्यिकांनी राष्ट्रवादाची संकल्पना कशा प्रकारे विकसित केली याची माहिती यावेळी त्यांनी दिली. इंग्रजी साहित्यिक शेक्सपियर यांच्या साहित्यामध्ये इंग्लंडमधील लोक संस्कृतीनुसार देशाची व्याख्या केली गेली आहे. इंग्लंड येथील तत्कालीन सामाजिक आणि राजकीय स्थितीवर राष्ट्रवाद अर्थात देशाची व्याख्या शेक्सपियरने केली होती. याप्रकारे भारतामध्ये देखील साहित्य क्षेत्रातील व्यक्तींकडून देशाची व्याख्या कशाप्रकारे केल्या गेली याचे उदाहरण डॉ. धार यांनी दिले. मुगल साम्राज्य काळात देश ही संकल्पना नव्हती. भारतामध्ये १८५७ स्वातंत्र्य युद्धानंतर प्रथम देश म्हणून विचार करण्यास सुरुवात झाली. यावेळी डॉक्टर धार यांनी बंगालच्या फाळणीचे उदाहरण दिले. बंगालच्या फाळणीच्या निर्णयाची घोषणा १९ जुलै १९०५ रोजी भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी केली होती. १६ ऑक्टोंबर १९०५ पासून फाळणीला सुरुवात झाली. या घटनेनंतर बंगालमधील सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी ‘बाॅयकाॅट ब्रिटिश’ हा नारा दिला होता. रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांच्या रचनेमधून राष्ट्र अर्थात देश याविषयी भावना व्यक्त केली. रवींद्रनाथ टागोर यांची राष्ट्रीयतेची व्याख्या तळागळाशी जुळलेली होती. तत्कालीन स्थितीमध्ये मातृभूमी अर्थात माता केंद्रबिंदू ठरली. मातृभूमीच्या मुलांनी मातेसाठी एकत्र आले पाहिजे ही भावना साहित्यातून निर्माण केली गेली. बंगालमधील तत्कालीन स्थितीत १९०८ मध्ये रवींद्रनाथ टागोर हे राष्ट्रवादाकडे वळले. १९१० ते १९२३ दरम्यान तत्कालीन धोरणे, पिळवणूक या विरोधात जनतेचा आक्रोश म्हणून रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्यात राष्ट्रवादाची भूमिका आणखी प्रखर होत गेली. त्यांनी त्यांच्या कवितेमधून राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. वेद, उपनिषदांमध्ये असलेली मानवता रवींद्रनाथ टागोर यांच्या राष्ट्रवादामध्ये दिसून येत होती. मात्र, विश्व महायुद्धाच्या काळात आपण आपल्या देशाच्या राष्ट्रवादाबाबत बोलत राहिलो तर ती आत्महत्या ठरेल, असे म्हणत संपूर्ण जगात मानवतावादी राष्ट्रवादाचा पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांनी केला होता असे डॉ. धार म्हणाले.
यावेळी अध्यक्षीय भाषण करताना प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या राष्ट्रवाद व मानवतावादी दृष्टिकोनाची माहिती त्यांच्या साहित्यातून प्रकट होत असल्याचे डॉ. धार यांनी त्यांच्या व्याख्यानातून दिल्याचे सांगितले. रवींद्रनाथ टागोर हे महान साहित्यिक मोठे कवी होते. साहित्यामधील प्रथम नोबेल पुरस्कार मिळवणारे ते गैर युरोपियन होते असे डॉ. दुधे यांनी सांगितले. नवीन पिढीने रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्यापासून प्रेरणा घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. संजय पळवेकर यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय डॉ. अक्षरा रोहनकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. रिमा खराबे यांनी केले तर आभार अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी यांनी मानले. कार्यक्रमाला प्राधिकारणी सदस्य, विभाग प्रमुख, अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.