अगदी आत्ता आत्ता पर्यंत जो संघ अनेकांच्या बहुतेकांच्या कित्येकांच्या चेष्टेचा टीकेचा टोचून बोलण्याचा दुर्लक्ष करण्याचा विषय होता आज त्याच संघ आणि संघाच्या मुशीतून तयार झालेल्या भाजपात कालचे टीका करणारे टोचून बोलणारे आपणहून सामील झाले आहेत, एवढेच काय संघाचे विचार आणि बौद्धिक कानावर पडावे यासाठी हे असे धडपडतात आणि एकाचवेळी काँग्रेसला विसरून नेमके संघ भाजप विचारसरणीला समजावून घेत देशातले या राज्यातले संघ भाजपाशी एकरूप होण्याचा मनापासून प्रयत्न करताहेत….थोडक्यात हिंदुत्व हेच नेमके राष्ट्रीयत्व संघ भाजपा बाहेरच्या नेत्यांना मनापासून पटलेले असल्याने त्यांनी क्रांतिकारी निर्णय घेत एकाचवेळी गांधी घराण्याला विसरून मोदींचे नेतृत्व आनंदाने स्वीकारले आहे. आमच्या लहानपणी ब्राम्हणेतर मोठ्या खुबीने आम्हाला मांसाहार करायला भाग पाडायचे आणि एकदा का आम्ही मांसाहार केला कि हा बामण बाटलेला वरून आम्हाला चिडवायचे, संघ तेच कायम सांगतो कि अमुक एखादा एकदा जरी संघस्थानावर आला कि तो कायमसवसरूपी मनातून मनापासून स्वयंसेवक असतो, संघ विसरणे त्याला शक्य नसते जे नेमके नक्की माझ्याही बाबतीत घडले आहे म्हणजे दहावी नंतर मी कधीही संघशाखेवर गेलो नाही किंवा संघ कार्याला अजिबात वाहून घेतलेले नाही… विशेष म्हणजे 1974 दरम्यान मी अकोल्याच्या मोहरी देवी खंडेलवाल विद्यालयात मे महीन्यात घेतलेल्या ज्या संघ शिक्षा द्वितीय वर्गाला गेलो होतो त्या शिबिराचे प्रमुख थेट मोहन भागवत होते ज्यांच्याशी त्या शिबिरादरम्यान सतत संपर्क यायचा …थोडक्यात आजही इतक्या वर्षांनंतर काही केल्या संघ विचार तेथल्या आठवणी व संस्कृती मला अजिबात विसरायला होत नाही किंबहुना मी 1982 ते 1987 दरम्यान जळगाव जिल्हा काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होतो त्यानंतर काँग्रेसशी एक कार्यकर्ता म्हणून तेथेही माझा संबंध उरला नाही पण जशी काँग्रेस मी पार विसरलो ते तसे संघाबाबत आजही होत नाही, ज्यांचा ज्यांचा संघाशी अप्रत्यक्ष आणि भाजपाशी प्रत्यक्ष संबंध आलेला आहे, आला असेल त्यांना देखील यापुढे अखेरच्या श्वासापर्यंत हिंदुत्व संघ भाजपा विसरणे अशक्य असेल….
नवर्याच्या कंबरेखाली आलेला फोड बायकोने इतरांना सांगायचे नसते तेच नेमके कायम सतत संघात घडते म्हणजे तुम्ही टॉप ते बॉटम, अगदी विश्वासात घेऊन संघाशी एकनिष्ठ असलेल्या कोणालाही संघ कार्यपद्धती किंवा संघात काय चालले आहे अगदी खोदून खोदून विचारा, तो एकही शब्द बोलणार नाही ….तरीही मी जी माहिती मिळवलेली आहे त्यावर याठिकाणी नक्की खळबळ माजणार आहे. संघांच्या आजवरच्या कोणत्याही सरसंघचालकाला नक्कीच कमी लेखून चालणार नाही पण त्यांच्यातदेखील कार्यपद्धतीत उजवा डावा असा फरक मला नेमका दाखवता येणे सहज शक्य असले तरी डॉ हेडगेवार गोळवलकर गुरुजी आणि देवरस यांच्या व्यतिरिक्त संघ प्रचार व कार्यपद्धतीत आधुनिक बदल घडवत पण मूळ संघ संस्कारांना अजिबात धक्का न लावता !!!
जगभरात मोठ्या शिताफीने अतिशय वेगाने संघ त्यापाठोपाठ भाजपाचे महत्व वाढविण्यात अतिशय खुबीने जगाला सामोरे जाणार्या मोहन भागवताना त्यांच्या कार्यपद्धतीला नक्कीच तोड नाही, अर्थात अटलबिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन पद्धतीने किंवा एक पाऊल पुढे एकट्या नरेंद्र मोदी यांनी देखील भाजपा जगाच्या नकाशावर कौतुकाचा विषय करून सोडला यात तिळमात्र शंका नाही. आजवरचे सर्वाधिक सरस धाडसी सरसंघचालक असा त्यांचा उल्लेख कदाचित माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य स्वयंसेवकांना ते रुचणारे नसेल म्हणून नेमकी आजवरच्या सरसंघचालकांची व्यापक तुलना करणे मी टाळतो. आपल्या हयातीत आणि सरसंघचालक म्हणूच पूर्णवेळ कार्यरत असतांना मोहन भागवत आपल्यानंतर कोण हे ठरवतील असे दिसते, वास्तविक त्यादृष्टीने त्यांच्या मनात नक्कीच दत्ताजी होसबळे असावेत पण त्यांचेही आजचे वय 67 म्हणून ते जसे अगदीच तरुण वयात सरसंघचालक झाले त्यापद्धतीने मोहनजी आजचे सह सह कार्यवाह मुकुंदजी किंवा महाराष्ट्राचे क्षेत्र प्रचारक अतुलजी लिमये या दोघांपैकी एक आपला उत्तराधिकारी निडून मोकळे होतील, डॉ हेडगेवारांनी जसे आपल्या मृत्युपत्रात माझ्यानंतर सरसंघचालक केवळ गोळवलकर गुरुजी असतील, लिहून ठेवलेले होते, तेच येथे घडेल. एखाद्या सर्वोच्च पदासाठी आपले नाव पुढे रेटणे हे महापाप असे उत्कृष्ट संस्कार जगभरात केवळ संघात बघायला मिळतात अगदी भाजपामध्ये देखील स्पर्धा असते…
अत्यंत महत्वाचे असे कि मोहन भागवत जेव्हा सरसंघचालक झाले तेव्हा देशात आणि राज्यात काँग्रेसची जवळपास सर्वदूर सत्ता होती काँग्रेस जोमात व जोशात असतांना काँग्रेस मध्ये गांधी घराण्यासहीत जे हिंदुतर दादागिरी करणारे काही मोठे नेते होते त्यांना देशातले हिंदुत्व आणि संघ विचार आणि एकंदर रा स्व संघ संपवून टाकायचे होते त्यावर फार मोठी ताकद काँग्रेसने पणाला लावलेली असतांना त्यात संघ भाजपाची प्रतिमा डागाळणे ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांना किंवा स्वयंसेवकांना आरोपी किंवा दहशतवादी ठरवून त्यांना आर्थिक मानसिक दृष्ट्या दुबळे करणे त्यावर व्यापक प्रयत्न त्यांचे सुरु होते पण उगाचच आगपाखड न करता अस्वस्थ होऊन वायफळ बडबडीत वेळ न घालविता वरून नव्या तरुण उत्साही स्वयंसेवकांची मोठी फळी उभारण्याचे क्लिष्ट काम नक्कीच भागवतांच्या हातून घडल्याने भारतीय हिंदूंना आपले हिंदुत्व सहज शाबूत ठेवणे शक्य झाले अर्थात मी काही संघ भाजपाचा प्रचारक नाही पण कट्टर हिंदुत्व मी मानत असल्याने हिंदूंच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असणाऱ्यांची दखल घेणे अत्यावश्यक ठरते. मला भागवतांचे नेहमीच कौतुक यासाठी वाटते कि ते संघाच्या राजकीय क्षेत्रातील मर्यादा सांभाळून म्हणजे संघात देखील राजकारण घुसले पद्धतीने वातावरण निर्माण न करता ज्या पद्धतीने सत्तेत्तले आणि जगातले हिंदुत्वाचे महत्व झपाटयाने वाढवताहेत त्याला तोड नाही आणि सुदैवाने त्यांना कट्टर स्वयंसेवक नरेंद्र मोदी यांची जोड आहे….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी