मुंबई :- महाराष्ट्र सागरी मंडळाअंतर्गत येणाऱ्या बंदराचा दर्जा व सोयीसुविधा वाढविण्यासाठी तसेच बंदरांची रस्ते, रेल्वे मार्गासोबत जोडणी करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.
आज मंत्रालयात आयोजीत महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाअंतर्गत येणाऱ्या बंदरांच्या आढावा बैठकीत मंत्री दादाजी भुसे बोलत होते. बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सौनी यांनी विभागनिहाय बंदरांच्या कामकाजाविषयी माहिती दिली.
राज्याला ७२० किमीची सागरी किनारपट्टी असून, त्याअंतर्गत मुंबई बंदर आणि जेएनपीटी बंदर दोन मुख्य प्राधिकरण पोर्ट तर, ४८ लहान बंदरे आहेत. त्याअंतर्गत मालवाहू आयात-निर्यात बंदरे, कॅप्टीव्ह जेट्टी, शिपयार्ड, ग्रीनफील्ड फोर्ड आणि विविध कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या जेट्टी असल्याची माहिती सादरीकरणाद्वारे डॉ. सौनी यांनी दिली.
यावेळी मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन शर्मा, बंदरे विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात उपस्थित होते.