पूज्य साने गुरूजी साहित्य नगरीतून मराठी साहित्यात तृतीयपंथीयांच्या दु:ख, व्यथा,‌ वेदनांची मांडणी व्हावी

– मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान‌ या विषयावरील परिसंवादात आशावाद

जळगाव :- साहित्य समाजाचा आरसा आहे. राज्यघटनेत प्रत्येकाला समान हक्क व संधी प्रदान केले आहेत. असे असताना मराठी साहित्यात तृतीयपंथीय समुदायाचे चित्रण दिसून येत नाही. तसेच तृतीयपंथीयांना समान वागणूक मिळत नाहीत. तेव्हा मराठी साहित्यिक व लेखकांनी तृतीयपंथीय, पारलिंगी समुदायाच्या दु:ख, व्यथा, वेदना, समस्या जाणून घेऊन साहित्यात चित्रण करावे. असा आशावाद ‘तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान’ या विषयावरील परिसंवादात सहभागी वक्त्यांनी व्यक्त केला.

भारत निवडणूक आयोगाच्या अधिनस्थ कार्यरत असलेल्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात ‘तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात ‘एलजीबीटीआयक्यू समुदायाचे अभ्यासक आणि बिंदू क्वीअर राइट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष बिंदुमाधव खिरे, तृतीयपंथी म्हणजेच पारलिंगी समुदायातील सामाजिक कार्यकर्त्या शमिभा पाटील, विजया वसावे, पुनीत गौडा, डैनियल्ला मॅक्डोन्सा आणि मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे सहभागी झाले.

मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे म्हणाले की, लोकशाहीच्या निवडणूक प्रक्रियेत तृतीयपंथीय समुदायाचे स्थान जसे महत्त्वपूर्ण आहे, तसे मराठी साहित्यातही तृतीयपंथीय समुदायाचे वास्तववादी चित्रण झाले आहे.

खिरे म्हणाले की, तृतीयपंथीय समुदायाचे साहित्यातील व समाजातील स्थान समजून घेतांना लिंग, लिंगभाव व लैंगिकता ह्या शब्दांचे अर्थ समजून घेतले पाहिजेत. पुनित गौडा म्हणाले की, पारलिंग पुरुष जन्माने स्त्री असतो. मात्र, मनाने तो पुरुष असतो. त्यांचे मन पुरुषाप्रमाणे घडत असते. डैनियल मॅक्डोन्सा म्हणाल्या की, माणसाला माणसाप्रमाणे वागविण्यासाठी धर्माची गरज पडत नाही. तृतीयपंथीय व्यक्तींचे मन समाजाने समजून घेतले पाहिजेत.

शमिभा पाटील म्हणाल्या की, पारलिंगी समुदायाचे साहित्यात चित्रण जास्त झाले नाही. अण्णाभाऊ साठे यांच्यानंतर अनेक वर्षांचा कालखंडात लिखाण झाले नाही. स्वाती चांदोरकर, दिशा पिंकी शेख, लक्ष्मी, पारू, मदन नाईक, नागा किन्नरी यांनी पारलिंगी समुदायाचे चित्रण त्यांच्या पुस्तके व कवितांतून मांडले आहे.

तृतीयपंथीय समुदायाची स्वतःची भाषा असते. तृतीयपंथी समाज आता समाज माध्यमातून लिहायला लागला आहे. साहित्य विश्वाने आमच्या जगण्याचे प्रश्न मांडले पाहिजेत, अशी अपेक्षाही शमिभा पाटील यांनी व्यक्त केली.

विजया वसावे यांनी वनरक्षक भरतीत त्यांना आलेल्या अनुभवाचे कथन केले.

निवडणुकांमुळे लोकशाहीचा ढाचा अबाधित राहतो, पण लोकशाही शासन व्यवस्था समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचून ती रसरशीत होणेही तितकेच महत्त्वाचे असते. या अनुषंगाने मराठी साहित्यात तृतीयपंथी समुदायाचे चित्रण झाले आहे का, ते कशा प्रकारे केले गेले आहे, ते करतांना लोकशाही, सांविधानिक मुल्यांचे प्रतिबिंब उमटले आहे का, त्यांच्यापर्यंत लोकशाही पोहोचली आहे का, ती पोहोचण्यासाठी काय करता येईल, अशा विविध प्रश्नांची चर्चा या परिसंवादात करण्यात आली.

मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्रा. डॉ. दीपक पवार परिसंवादाचे संवादक होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नदी सुरक्षा भिंतीच्या बांधकाम प्रक्रियेला सुरूवात होणार

Sat Feb 3 , 2024
– मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले नदी सफाई अभियानाचे निरीक्षण नागपूर :– नागपूर शहरातून वाहणा-या नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदी या तिनही नद्यांच्या स्वच्छतेचे काम सुरू आहे. या सफाई अभियाना अंतर्गत नदीच्या प्रवाहात येणारे अडथळे दूर करून प्रवाह सुरळीत करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. तसेच त्यांनी पुरामुळे कोसळलेल्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com