जनसमस्यांसंदर्भात तातडीने कार्यवाही करा : डॉ.नितीन राऊत

नागरिकांच्या विविध समस्यांसंदर्भात मनपामध्ये सुनावणी

नागपूरता.  : नागरिकांच्या पाणी, अतिक्रमण यासोबतच अन्य विविध समस्यांच्या संदर्भात तातडीने दखल घेउन आवश्यक ती कार्यवाही करून जनतेला दिलासा मिळवून द्या, असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रशासनाला दिले.

      नागरिकांच्या विविध विषयांच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारीवर सोमवारी (ता.२) पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सुनावणी घेतली. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील आयुक्त सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी आर.विमला, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती  मनोजकुमार सुर्यवंशी, नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी  चिन्मय गोतमारे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, राम जोशी, उपायुक्त  निर्भय जैन,  रवींद्र भेलावे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सहायक आयुक्त  महेश धामेचा,  अशोक पाटील, कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, अविनाश बारहाते, सोनाली चव्हाण, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर यांच्यासह रेल्वे, जिल्हाधिकारी कार्यालय, नासुप्र चे अधिकारी उपस्थित होते.

      पालकमंत्र्यांच्या बैठकीत डॉ. सुबोध नंदागवळी व बालमुकुंद जनबंधु यांनी वांजरा, पांजरा आणि कळमना येथे पाण्याचे कनेक्शन देण्यासंदर्भात समस्या मांडली तर सुरेश पाटील, सतीश पाली, मनोज सांगोळे, राकेश निकोसे यांनी उत्तर नागपुरातील पिण्याच्या पाण्यासंदर्भात समस्या मांडली. वांजरा येथे नारा येथील नासुप्रच्या निर्मल कॉलनी येथील पाण्याच्या टाकीतून व पांजरा येथे सुगम नगर येथील पाण्याच्या टाकीतून पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे पाण्याचा प्रवाह व अन्य अडचणी येतात. पांजरा येथे पाणी पुरवठा होण्यास अडथळे असल्याने टँकरने पाणी पुरवठा केला जातो. येथे पांजरा येथे नव्याने बांधलेल्या टाकीतून पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. यावर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी नारा, पांजरा या भागातून पाणी पुरवठा होणारा परिसर मोठा असल्यामुळे येथे दोन टाक्यांची गरज पडली असल्याचे सांगतिले. निर्मल कॉलनी येथील पाईप लाईन जुनी असल्यामुळे येथे लिकेज आहेत. त्यामुळे ती बदलविणे आवश्यक असून सुरूवातीला नासुप्र द्वारा ती पाईप लाईन टाकण्यात आल्याने सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी मनपा आणि नासुप्र ने समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

उत्तर नागपुरातील अनेक भागामध्ये नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू असल्याची माहिती यावेळी कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी यांनी दिली. पाणी पुरवठा मनपा आणि ओसीडब्ल्यू यांचे योग्य समन्वय असणे आवश्यक असून यासंदर्भात प्रशासनाने कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

      विनोद सोनकर, सुरेश जग्यासी, नेपाल शाह आणि विकास गौर यांनी मांडलेल्या भीमनगर झोपडपट्टी व जुना जरिपटका रेल्वे लाईनच्या बाजुला असलेल्या अतिक्रमणासंदर्भात तक्रार मांडली. या भागात मागील ६० वर्षांपासून अतिक्रमण असल्याने येथील अतिक्रमण हटविताना स्थानिकांचे पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात आली. सदर विषयाच्या अनुषंगाने आपण केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी संवाद साधणार असल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले. रेल्वे विभागाद्वारे सदर प्रकरणाच्या अनुषंगाने न्यायालयात नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा अंतर्भाव करून माहिती सादर करण्याचेही त्यांनी निर्देश दिले.

भांडेवाडी येथे इसाई धर्मीयांसाठी दफनभूमिची मागणी ॲड.विपीन बाबर आणि फादर जोसेफ बाबर यांनी केली. भांडेवाडीतील १.२ हेक्टर जागा ही इसाई धर्मीयांच्या दफनभूमिसाठी राखीव असून यासाठी इसाई धर्मीयांच्या चार संघटनेकडून मागणी पत्र आल्याची माहिती यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिली. सर्व इसाई धर्मीयांची एकच मागणी असून कुठलीही संघटना गृहित न धरता संपूर्ण इसाई धर्मींसाठी दफनभूमी असावी यादृष्टीने जागा देण्यासंदर्भात पालकमंत्र्यांनी यावेळी सूचित केले. मनपाद्वारे इसाई धर्मीयांना अटी आणि शर्तीच्या अधीन राहून जागेचे पालकत्व देण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. याला तक्रारकर्त्यांनी होकार दर्शविला.

      मोमिनपूरा येथील मुस्लीम लायब्ररीच्या संदर्भात नुरूल हक आणि असलम मुल्ला खान यांनी समस्या मांडली. १९३० पासून मुस्लीम लायब्ररीला मनपाद्वारे जागा लिजवर देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. सदर जागेवर झालेल्या अतिक्रमणासंदर्भात मनपाद्वारे करण्यात येणा-या कारवाईला मुस्लीम लायब्ररीद्वारे सर्व सहकार्य करण्यात येणार असून लीज नूतनीकरण करण्याची मागणी करण्यात आली. मुस्लीम लायब्ररीचा ताबा मनपाने स्वत:कडे घेउन इतर सर्व अतिक्रमण हटवून घ्यावे व या जागेवर मनपाने सुरक्षा भिंत बांधण्याचे निर्देश पालकमंत्री पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. लीज नूतनीकरणाबाबत असलेल्या कायदेशीर बाबींची यावेळी मनपा आयुक्तांनी माहिती दिली. त्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. सदर जागेवर सुरक्षा भिंत बांधण्यासाठी शासनाद्वारे निधी उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी विश्वस्त केले. शिवकृष्ण धाम वस्तीला झोपडपट्टी घोषित करण्याच्या बाबुराव वमरतवार यांच्या मागणीवर कार्यालयीन कार्यवाही सुरू असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अविनाश बारहाते यांनी दिली.

      नागरिकांद्वारे मांडण्यात आलेल्या विविध समस्यांच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या निर्देशान्वये तातडीने कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश यावेळी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले. संपूर्ण विषयांच्या अनुषंगाने झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्याबाबत लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगतिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गहुहिवरा रोड वर बोलेरो वाहनाची सायकलला धडक, एक गंभीर जख्मी

Tue May 3 , 2022
 कन्हान पोस्टे ला वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल.   कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस चार कि मी अंतरावर असलेल्या गहुहिवरा ते खोपडी रोड वर एका बोलेरो पिकअप वाहनाने प्रज्वल ज्ञानेश्वर लुहरे याचा मित्रा अनिकेत रामुजी दोडके च्या साईकल ला समोरू न जोरदार धडक मारून झालेल्या अपघातात अनिके त दोडके गंभीर जख्मी झाल्याने कन्हान पोलीस स्टेश न ला अज्ञात वाहन चालका […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!