– अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी
नागपूर :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदार संघात EVM व VVPAT मशीनचे मतदारांना प्रशिक्षण, प्रसार, प्रसिध्दी व जनजागृती करण्याकरिता EVM प्रात्यक्षिक केंद्र आणि मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅन (MDV) स्थापित करण्यात आली असून जनजागृती चित्ररथ 12 विधानसभा क्षेत्रात फिरणार आहे. या चित्ररथाचा प्रारंभ अपर जिल्हाधिकारी आशा पठाण व उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रविण महिरे यांनी मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून केला.
उपजिल्हाधिकारी माधूरी तिखे, तहसीलदार वैशाली पाटील, राहूल सारंग यावेळी उपस्थित होते. प्रत्येक मतदार संघात दोन मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅन व्दारे EVM बाबत जनजागृती जिल्हयातील प्रत्येक मतदान केंद्र इमारतीचे ठिकाणी 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत करण्याचे नियोजित आहे. तसेच EVM प्रात्यक्षिक केन्द्र प्रत्येक विधानसभा मतदार संघस्तरावर मतदारांना प्रात्यक्षिकासाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅनव्दारे (MDV) जनजागृती मोहिमेचे वेळापत्रक विधानसभा मतदार संघ निहाय तयार करून मतदारात जागरुता निर्माण करण्याकरिता भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राच्या क्षेत्रात,गाव व शहरातील मुख्य चौक, बाजार, शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींची कार्यालये, सभांच्या ठिकाणी इत्यादी मोक्याच्या ठिकाणी मोबाइल व्हॅनव्दारे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनची प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी व मतदारांना अभिरुप मतदान करण्यासाठी या कार्यालयामार्फत 19 डिसेंबर 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत ईव्हीएम जनजागृती मोहिम राबविण्यात येणार असून याचा लाभ जिल्हयातील मतदारांनी घ्यावा, असा संदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिला आहे.