– एक तास अनावश्यक वीज दिवे बंद करून नागरिकांचे सहकार्य
नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी (ता.३) मंगलमूर्ती चौक परिसरात पौर्णिमा दिवसाच्या निमित्ताने जनजागृती करण्यात आली. वीज बचतीसाठी माजी आमदार तथा माजी महापौर प्रा. अनिल सोले यांच्या मार्गदर्शनात पौर्णिमा दिवस या महत्त्वपूर्ण उपक्रमाची सुरूवात करण्यात आली.
मंगळवारी प्रा. अनिल सोले यांनी मंगलमूर्ती चौकामध्ये स्वत: उपस्थित राहून नागरिकांमध्ये जनजागृती केली व ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे स्वयंसेवक करीत असलेल्या जनजागृती कार्याची प्रसंशा करीत त्यांना प्रोत्साहन दिले. जनजागृती उपक्रमा दरम्यान ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी परिसरातील व्यापारी बांधवाना, आस्थापनांना भेट देउन तिथे वीज बचतीचे महत्व सांगितले व नागरिकांना किमान १ तास अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले. या उपक्रमात परिसरातील नागरिकांनीही सहभाग नोंदवित जनजागृती कार्य केले. परिसरातील व्यापारी बांधवांनीही मनपा व ग्रीन व्हिजिल फाउंडेशनच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विद्युत दिवे बंद करून उपक्रमात आपले योगदान दर्शविले.
ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तव चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव, प्रिया यादव, श्रीया जोगे, प्रिया यादव आदींनी जनजागृती केली. त्यांना परिसरातील नागरिक भोलानाथ साहारे, विषमय फुले, कविता मेश्राम, अनिल झोडे, सुधीर घोडेस्वार, रजनी शर्मा, डॉ. रुची हुमने, भाग्यश्री चन्ने, श्रुती देशपांडे, किशोर भागडे आदींनी सहकार्य केले.