– मनपा अधिका-यांसोबत बैठक शनिवारी
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या लीज धारकांच्या विषयांच्या अनुषंगाने मनपा अधिका-यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याच्या उद्देशाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव संदीप जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी २७ मे रोजी आढावा बैठक घेण्यात येणार आहे.
सिव्हिल लाईन्स येथील ‘देवगिरी’ या उपमुख्यमंत्री बंगल्यातील मानद सचिव संदीप जोशी यांच्या कक्षात सकाळी ११ वाजता ही बैठक होईल.
लीज धारकांचा प्रलंबित विषय आणि समस्यांच्या अनुषांगाने नागरिकांकडून उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदीप जोशी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावरून संदीप जोशी यांनी लीज धारक आणि मनपा अधिका-यांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे.
नागपूर महानगरपालिकेद्वारे लीजवर गाळे, ओटे, जागा देण्यात आलेल्या आहेत. संबंधित लीज भाडे स्वीकृत करताना मनपाला येणा-या अडचणी तसेच लीज धारकांचे विविध प्रश्न आणि समस्या यामुळे मनपा लीज धारकांचा विषय मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हे सर्व विषय निकाली काढले जावेत यासाठी उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात येईल. बैठकीत बाजार शुल्क, शास्ती, परवाना नूतनीकरण, वापर शुल्कामध्ये वाढ या आणि अशा विविध विषयांवर सांगोपांग चर्चा केली जाईल. चर्चेअंती अंतिम निर्णयासाठी उपमुख्यमंत्र्यांकडे सविस्तर अहवाल सादर करण्यात येईल.
बैठकीमध्ये मनपा अधिका-यांसोबतच मनपा लीज धारकांचे शिष्टमंडळ देखील उपस्थित राहणार आहेत. उपरोक्त विषयाशी संबंधित नागरिकांनी देखील या बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव संदीप जोशी यांनी केले आहे.