चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे शहरात मान्सुनपूर्व स्वच्छता अभियान राबविले जात असुन अभियानानंतर्गत १३ मोठे व संभाव्य धोकादायक झाडे तसेच १० धोकादायक झाडांच्या फांद्या आतापर्यंत तोडण्यात आल्या आहेत. धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणी हा मान्सुनपूर्व कामांमधील एक महत्वाचा विषय असून सार्वजनिक ठिकाणच्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याचे काम पावसाळा सुरु होण्याच्या आत संपविण्याचे निर्देश आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले आहेत.
सदर अभियानास २९ मे पासून सुरवात करण्यात आली असुन उद्यान विभागाने पावसाळ्यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या आणि धोकादायक झाडांच्या फांद्यांची पद्धतशीर आणि शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी सुरू केली आहे. शहरातील नागपूर रोड,साई मंदिर परिसर,तुकूम ट्रॅफीक ऑफीस ते मेजर गेट,तुकूम गुरुद्वारा ते बंगाली कॅम्प ते बस स्टॅन्ड या मुख्य रस्त्यांवरील धोकादायक वृक्ष छाटणीचे काम पूर्ण करण्यात आले असुन इतर परिसरात काम सुरू आहे.याकरीता ६ कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत असुन झाडाच्या फांद्या कापण्यासाठी कामगाराला झाडावर चढवण्यातही दुर्घटना होण्याचा संभव असल्यामुळे आवश्यक तेथे वृक्ष छाटणी करण्यासाठी यांत्रिक पद्धतीचा वापर करण्यात येत आहे.
पाऊस पडल्यावर झाडाच्या खोडाला ओत येते, झाडावर चढता येत नाही त्यामुळे पावसाळ्यापुर्वी काम पूर्ण करण्यात येणार आहे.
झाडांच्या फांद्या तोडतांना पुर्ण झाड उध्वस्त होणार नाही याची काळजी घेतली जात असुन वृक्ष छाटणी केल्यावर निर्माण होणारा कंपोस्ट डेपोला जमा करण्यात येतो व ती जागा स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ करण्यात येते.
झाडांच्या फांद्या छाटणी कामांचे विभागनिहाय नियोजन करून दररोज कोणत्या क्षेत्रात, किती काम झाले याचा तपशील नियमित आयुक्तांना सादर केला जात असुन त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रहदारीला अडथळा करणा-या अथवा पथदिव्यांचा प्रकाश रोखणा-या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येत आहे.