मुंबई :- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून टिप्पणी करून तेली समाजाचा आणि एकूणच ओबीसींचा अपमान केला होता. त्यांचा आपण निषेध करतो. राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी राज्यभर आंदोलन करेल, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी केले. ओबीसी समाज राहुल गांधी यांना जागा दाखवून देईल, असा इशारा त्यांनी दिला.
ते मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, प्रदेश मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये, प्रदेश सहमुख्य प्रवक्ता विश्वास पाठक, प्रदेश माध्यमप्रमुख नवनाथ बन, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, प्रदीप पेशकर आणि श्वेता शालिनी उपस्थित होते.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी एका जाहीर सभेत मोदी आडनावावरून अपमानास्पद सवाल केला होता. राहुल गांधी यांनी तेली समाजाचा आणि एकूणच ओबीसींचा अपमान केला आहे. आपण त्यांचा निषेध करतो.
ते म्हणाले की, काँग्रेसची जातीयवादी वृत्ती यातून दिसून येते. राहुल गांधी अजूनही राजेशाही मानसिकतेततून बाहेर पडले नाहीत असे या वक्तव्यावरून दिसते. तथापि, कोणी कितीही मोठा असला तरी देशाचा कायदा आणि संविधान सर्वात श्रेष्ठ आहे, हे न्यायालयाच्या निर्णयावरून दिसले.
त्यांनी सांगितले की, न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर आता राहुल गांधी आपणच बळी असल्याचा आव आणू शकत नाहीत. तेली समाजाचा आणि एकूणच ओबीसी समाजाचा अपमान केल्याबद्दल राहुल गांधी माफी मागणार की नाही आणि न्यायालयाने दिलेली शिक्षा स्वीकारणार की नाही असा आपला सवाल आहे.
न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याच्या ऐवजी काँग्रेस नेते रस्त्यावर आंदोलने करून संविधानाचा अपमान करत आहेत. राहुल गांधी यांच्यावरील शिक्षेची कारवाई केंद्र सरकारच्या दबावाखाली झाली हा काँग्रेस नेत्यांचा आरोप न्यायालयाचा अवमान करणारा आहे. जातीयवादी वृत्तीने ओबीसींचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला न्यायालयाचा निर्णयही मान्य नाही हे धक्कादायक आहे. न्यायालयाच्या अवमान करण्याबद्दल भाजपा दाद मागेल, असेही ते म्हणाले.