६ ते २८ फेब्रुवारीपर्यंत १०० टक्के तर १ ते १५ मार्च ५० टक्के सूट मिळणार
चंद्रपूर – चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत मालमत्ता कर व इतर करांचा एकरकमी भरणा करणाऱ्याना १०० टक्के शास्तीत माफी देण्यात येत आहे. ६ फेब्रुवारीपासून ही योजना सुरु होत असून, २८ फेब्रुवारी रोजी १०० टक्के माफीची शेवटची मुदत आहे. तसेच १ ते १५ मार्च ५० टक्के सूट मिळणार असुन शास्तीचा लाभ घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी केले आहे. दरम्यान, थकबाकीदारांचे गाळे सील करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मालमत्ता व पाणी कराचा एकरकमी भरणा करणाऱ्यांना मालमत्ता करावरील शास्तीत १०० टक्के सूट ६ ते २८ फेब्रुवारी तर १ मार्च ते १५ मार्च पर्यंत कराचा एकरकमी भरणा करणाऱ्यांना मालमत्ता करावरील शास्तीत ५० टक्के सुट जाहीर करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात ८० हजार मालमत्ता असून, संपूर्ण मालमत्तांच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे मागणी नोंदवली जाते. करदात्यांना कराची नोटीस पाठवून कर भरणा करण्यासाठी विनंती करणे ही कर विभागाची पहिली प्रक्रिया मानली जाते. जास्तीत जास्त वसुली होऊन ती शहराच्या विकास कामांसाठी उपयोगी यावी या अनुषंगाने यंत्रणा जोमात कामाला लागली आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या आणि टाळाटाळ करणाऱ्या दुकानदारांचे गाळे सील करण्याची कारवाई सुरू आहे. मोठ्या प्रमाणात कराची थकबाकी असल्याने वसुलीसाठी प्रत्येक झोननिहाय जप्ती पथक गठीत करण्यात आले असुन सदर जप्ती पथके पुर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. https://chandrapurmc.org या लिंकवर मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करता येऊ शकतो. १०० टक्के सूट मिळविण्यासाठी कार्यालयीन वेळेत भरणा करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.