संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- गावाच्या विकासासाठी व इतर दैनंदिन गरजेच्या पूर्ततेसाठी घरपट्टी,पाणीपट्टी व इतर कर हे ग्रामपंचायतच्या उत्पन्नाचे मुख्य साधन असल्याने भिलगाव ग्रामवासीयांनी आपल्याकडील थकीत कराचा भरणा करून ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन भिलगाव ग्रामपंचायतच्या सरपंच भावना फलके यांनी केले आहे.
ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक भाग आहे. तर घरपट्टी,पाणीपट्टी व इतरकर ग्रामपंचायत उत्पन्नाचे साधन आहेत.शासनामार्फत ग्रामपंचायतीला विविध योजनेचा निधी मिळतो मात्र तो गावातील विकासकामांवर खर्च होतो त्यामुळे ग्रामपंचायत अंतर्गत गावातील दैनंदिन कामे पूर्ण करण्यासाठी कर वसुली हे एकमेव साधन आहे. त्यात गावात दररोज पाणीपूरवठा करणे,पाणीपूरवठा योजनेची दुरुस्ती,ब्लिचिंग पावडर खरेदी,विद्दुत बिलाचा भरणा,दिवाबत्ती कर्मचाऱ्यांचा पगार,गावातील स्वछता राखणे,नाली सफाई,किरकोळ दुरुस्ती,कार्यालयीन खर्च ,आरोग्य,शिक्षण व महिला व बालकल्याण यासारखी अनेक नित्याची व पूरक विकासाची कामे ग्रामपंचायतीला करावे लागते व ह्या कामासाठी ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळने आवश्यक आहे त्यामुळे मालमत्ता धारकांनी आपल्या कडील थकीत कराचा भरणा करून ग्रामपंचायतला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.