गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यात विदर्भ साहित्य संघाची कार्यकारिणी स्थापन झाल्याने येथील साहित्य चळवळीला नवसंजीवनी मिळाली आहे. या उपक्रमामुळे स्थानिक लेखक, कवी आणि नवसाहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल, तसेच मराठी भाषा आणि साहित्याचा वारसा अधिक समृद्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी व्यक्त केला.
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात शनिवारी झालेल्या या उद्घाटन सोहळ्यात विदर्भ साहित्य संघाचे केंद्रीय सदस्य डॉ. श्याम मोहरकर, सरचिटणीस विलास मानेकर, साहित्यिक श्याम माधव धोंड, इंद्रजित ओरके, तीर्थराज कापगते, सतीश चिचघरे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. विदर्भ साहित्य संघाच्या योगदानाचा आढावा घेताना अध्यक्ष प्रदीप दाते म्हणाले की, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही दर्जेदार साहित्य निर्माण होऊ शकते आणि त्यासाठी साहित्य संघ हे योग्य व्यासपीठ ठरेल.
डॉ. श्याम मोहरकर यांनी विदर्भ साहित्य संघाच्या कार्याचा मागोवा घेत मराठी साहित्याच्या वृद्धीसाठी अशा शाखांची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले. गडचिरोलीत अनेक प्रतिभावान लेखक असून, त्यांना योग्य संधी दिल्यास मराठी साहित्य क्षेत्रात मोठा ठसा उमटवू शकतात, असे ते म्हणाले.
साहित्यिक श्याम माधव धोंड यांनी कवींच्या रचनांच्या माध्यमातून आपल्या भाषणात रसिकांना मंत्रमुग्ध केले. उत्तम साहित्य निर्माण करण्यासाठी सकस वाचन गरजेचे असून, नवसाहित्यिकांनी याकडे विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी सांगितले की, या कार्यकारिणीच्या स्थापनेमुळे गडचिरोलीतील साहित्य चळवळीला मोठी चालना मिळेल. स्थानिक लेखक आणि कवींना प्रेरणा मिळेल आणि त्यांच्या कलाकृतींना व्यापक संधी मिळेल.
कार्यक्रमाचे संचालन गौरी तळवलकर यांनी केले, तर आभार रामचंद्र वासेकर यांनी मानले. गडचिरोली जिल्हा कार्यकारिणीत अध्यक्ष प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, कार्याध्यक्ष डॉ. सविता गोविंदवार, उपाध्यक्ष प्रमोद बोरसरे आणि डॉ. विलास खुणे, सचिव रामचंद्र वासेकर, सहसचिव डॉ. गणेश चुदरी, कोषाध्यक्ष प्रा. प्रदीप चापले, प्रसिद्धी प्रमुख मिलिंद उमरे आणि साहित्य व सांस्कृतिक प्रमुख चेतन गोरे यांचा समावेश आहे.
या कार्यकारिणीच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील नवोदित साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळेल. विदर्भ साहित्य संघाच्या या पुढाकारामुळे मराठी साहित्य चळवळीला नवसंजीवनी मिळेल आणि अभिजात मराठी भाषेचा वारसा अधिक समृद्ध होईल.