देशांतर्गत अध्यात्मिक पर्यटनातून विकासाला चालना, रोजगारांच्या संधींमध्येही वाढ – अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर

– शिर्डीतील वार्तालाप कार्यशाळेस पत्रकारांचा उत्तम प्रतिसाद, शासकीय योजनांच्या लाभार्थींनी कथन केला अनुभव

शिर्डी :- देशांतर्गत पर्यटनामध्ये अध्यात्मिक पर्यटनाचा वाटा सर्वाधिक आहे. अध्यात्मिक पर्यटनाच्या माध्यमातून संबंधित परिसराच्या विकासाला चालना मिळते. तसेच तेथील रोजगारांच्या संधींमध्येही वाढ होते, असे मत अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी व्यक्त केले.

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या पत्र सूचना कार्यालयातर्फे आज (बुधवार, दिनांक 6 मार्च) ‘अध्यात्मिक पर्यटनाचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम’ या विषयावर आयोजित वार्तालाप माध्यम परिषदेचे उद्घाटन कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पोलीस उपअधीक्षक शिरिष वमने, श्री साईबाबा सेवा संस्थान ट्रस्ट, शिर्डीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, पत्र सूचना कार्यालय, पुणेचे उपसंचालक महेश अय्यंगार आणि माध्यम अधिकारी हर्षल आकुडे हे उपस्थित होते. तर, शिर्डी, राहता, श्रीरामपूर आणि कोपरगाव परिसरातील सुमारे 100 पत्रकार या कार्यशाळेमध्ये सहभागी झाले होते.

पत्र सूचना कार्यालय पुणेचे उपसंचालक महेश अय्यंगार यांनी आपल्या प्रास्ताविकात पत्र सूचना कार्यालयाच्या कामाविषयी माहिती दिली. पत्र सूचना कार्यालय ही केंद्र सरकारची धोरणे, कार्यक्रम आणि आजवरचे यश याबाबतची माहिती मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांपर्यंत अधिकृतरित्या पोहचवणारी मध्यवर्ती यंत्रणा असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांशी संपर्क साधणे आणि शासनाची धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्र सूचना कार्यालय विविध विषयांवरच्या चर्चासत्रांचे आयोजन करते. अशी चर्चासत्र म्हणजे, तळागाळातील लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे आणि त्याचवेळी सरकार आणि माध्यमांमधे एक दुवा निर्माण करणारे माध्यम आहे, असे महेश अय्यंगार यांनी सांगितले.

उद्घाटनपर भाषणात कोळेकर यांनी शिर्डी परिसरात प्रस्ताविक विकासकामांचा आढावा घेतला. पर्यटनाच्या विकासासाठी केंद्र तसेच राज्य सरकार कालबद्ध पद्धतीने कार्यरत असून भविष्यात याचे परिणाम दिसतील, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की अहमदनगर जिल्ह्यात पर्यटनाशी संबंधित अनेक ठिकाणे आहेत. त्यांची माहिती राज्यात सर्वत्र पोहोचवण्यामध्ये माध्यमांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशातील अध्यात्मिक पर्यटनामध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. याचा विचार करून शासनाने शिर्डीच्या विकासासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याअंतर्गत शिर्डी येथे 32 एकर परिसरात शासकीय कार्यालयांची उभारणी करण्यात येत आहे. त्यामध्ये नाट्यगृहे, बहुद्देशीय सभागृह यांचाही समावेश असणार आहे.

त्याशिवाय शिर्डी येथे उद्योग आणण्याच्या दृष्टीनेही शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. शिर्डी हे अध्यात्मिक क्षेत्र असल्याने येथे येणारे उद्योग हे प्रदूषणविरहीत असतील, याची काळजीही घेण्यात येईल. तसेच कोपरगाव परिसरात पशुवैद्यकीय महाविद्यालय यांच्यामुळे येथील विकासाला चालना मिळेल. येथील विकास हा एकात्मिक स्वरुपाचा सर्वांना सामावून घेणारा असला पाहिजे, असे शासनाचे धोरण आहे. या सर्व कामांच्या बळावर शिर्डी परिसरात रोजगाराच्या संधीही वाढतील, असंही बाळासाहेब कोळेकर यांनी सांगितले.

पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने म्हणाले, शिर्डीचा मोठ्या प्रमाणात कायापालट होत असून यादरम्यान शहर हे स्थित्यंतरामधून जात आहे. या घडामोडींमध्ये पोलिसांचीही मोठी भूमिका असते. त्यामुळे शिर्डीत दाखल होणाऱ्या भाविकांना सुरक्षित वातावरण देणे, गुन्हेगारी प्रवृत्तींना प्रतिबंध करणे, ही भूमिका पोलीस प्रशासन जबाबदारीने पार पाडत आहे.

कार्यशाळेतील पहिल्या सत्रात श्री साईबाबा सेवा संस्थान ट्रस्ट, शिर्डीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी ‘अध्यात्मिक पर्यटनवाढीसाठी संस्थान ट्रस्टच्या भावी योजना’ या विषयावर माहिती दिली. ते म्हणाले, कोरोना काळानंतर शिर्डीच्या विकासात वाढ पाहायला मिळत आहे. 2022 या वर्षात शिर्डीला 1 कोटी 72 लाख पर्यटकांनी भेट दिली. तर 2023 मध्ये हाच आकडा 1 कोटी 90 लाखांवर गेला. इतक्या मोठ्या संख्येने पर्यटक शहरात दाखल होत असताना त्यांना सोयीसुविधा देणे, हे आव्हानात्मक काम आहे. संस्थान त्यासाठी प्रयत्न करत असून भाविकांना राहण्याची उत्तम सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिर्डीत दाखल होणारे भाविक हे जास्तीत जास्त काळ येथे वास्तव्याला राहावेत, त्यांनी परिसरातील पर्यटन क्षेत्रांनाही भेट द्यावी या दृष्टीने प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करण्याची संस्थानची तयारी आहे, असे त्यांनी सांगितले.

यानंतर ‘धार्मिक पर्यटन : आर्थिक आणि सामाजिक परिणाम’ या विषयावर बोलताना ज्येष्ठ पत्रकार आणि आर्थिक विषयातील तज्ज्ञ यमाजी मालकर म्हणाले की जगातील सर्वात मोठ्या पहिल्या 10 उद्योगांमध्ये पर्यटन उद्योगाचा समावेश होतो. भारतात अध्यात्मिक पर्यटन हे वर्षानुवर्षे चालत आलेले असून वृद्धापकाळात चारधाम यात्रा करणे हा त्याचाच एक भाग होता. भारताच्या जीडीपीमध्ये पर्यटन क्षेत्राचा वाटा 5.8 टक्के इतका आहे. अमेरिका, चीन, जर्मनी, जपान आणि इटलीनंतर हा वाटा सर्वाधिक असलेला भारत हा सहावा देश आहे.

ते पुढे म्हणाले, पर्यटनाचे आर्थिक परिणाम असतात, तसेच याचे सामाजिक परिणामही पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणावर भाविक एकत्र येऊन सामाजिक सलोखा वाढीस लागतो. कारागीर आणि कलाकारांना प्रोत्साहन मिळून प्राचीन कला-संस्कृतीचे रक्षणही त्यामुळे होते, असे त्यांनी सांगितले.

‘शिर्डीतील पर्यटन वाढीसाठी केंद्र सरकारचे सहाय्य आणि एमटीडीसीचे प्रयत्न’ या विषयावर एमटीडीसी, नाशिक विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण यांचे सादरीकरण झाले. एमटीडीसीच्या ब्रेड अँड ब्रेकफास्ट योजनेअंतर्गत स्थानिक रहिवाशांना रोजगाराची संधी देण्यात येते. यामध्ये एमटीडीसी पोहोचू शकलेल्या भागात स्थानिकांच्या घरांचे रुपांतर हॉटेलमध्ये करण्यात येते, कोकण परिसरात याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या महाराष्ट्रात कोणत्याही इतर खासगी कंपन्यांपेक्षाही सर्वाधिक रेसॉर्ट हे एमटीडीसीकडे आहेत. अतिथी देवो भवं, हे ब्रीद पाळून एमटीडीसी काम करत आहे, असे त्यांनी सांगितले.

‘विकास पत्रकारिता आणि त्याचे ग्रामीण भागातील महत्त्व’ या विषयावर सोलापूर विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे निवृत्त विभागप्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलकर यांचे सत्र झाले. ते म्हणाले,

स्वातंत्र्यपूर्व काळात प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकांनी वर्तमानपत्रांच्या माध्यमातून लढा उभा केला होता. आताच्या काळात त्याला विकासाचे स्वरुप देण्याची आवश्यकता आहे. सर्वसामान्यांच्या दुःखांची मांडणी योग्यरित्या करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणे, त्यांच्या विकासासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणे, याला विकास पत्रकारिता संबोधतात, असेही त्यांनी सांगितले.

तर, ‘शिर्डीतील पर्यटन विकास : बँकांची भूमिका,’ या विषयावर शिर्डीतील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे वरीष्ठ प्रबंधक प्रमोद दहिफळे मार्गदर्शन केले. केंद्र सरकारमार्फत देण्यात येत असलेल्या पीएम मुद्रा, पीएम स्वनिधी यांसारख्या योजनांचा लाभ बँकांकडून कशा प्रकारे मिळवावा, याची माहिती त्यांनी दिली. यावेळी केंद्र सरकारच्या पीएमएफएमई योजनेच्या लाभार्थी पल्लवी जगताप यांनी आपल्या मसाले, पापड आणि शेवयांच्या व्यवसायाला मिळालेल्या कर्जाबाबत अनुभव कथन केले आणि समाधानही व्यक्त केले.

शेवटच्या सत्रात ‘ग्रामीण भागातील माध्यमांचे विकासात्मक संवादात योगदान आणि जनसेवेसाठी माध्यमांना पीआयबीची कशी मदत होईल’ या विषयावर पत्र सूचना कार्यालयाचे माध्यम अधिकारी हर्षल आकुडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आकुडे यांनी पत्रकार कल्याण योजना आणि पीआयबी फॅक्ट चेक यांच्याविषयीही सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन पत्र सूचना कार्यालयाच्या माहिती सहायक सोनल तुपे यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अपेडामुळे नव्या बाजारपेठांमध्ये कृषी निर्यात सुलभ; ताजी फळे, भाज्या आणि श्री अन्न याच्या निर्यातीवर लक्ष केंद्रित

Wed Mar 6 , 2024
– इराक, व्हिएतनाम, सौदी अरेबिया यांना केल्या जाणाऱ्या निर्यातीत उत्तम वाढ नवी दिल्‍ली :- भारतातून कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण(अपेडा) विविध उपक्रम हाती घेत आहे. अपेडाच्या दूरदर्शी धोरणांमध्ये, केवळ काही उत्पादनांवरील अवलंबित्व कमी करून मूल्य शृंखला वृद्धिंगत करण्यासाठी ताजी फळे, भाज्या, प्रक्रियाकृत पदार्थ आणि प्राणिज उत्पादने यासारख्या प्राधान्य उत्पादनांवर लक्ष केंद्रित करून निर्यातीतले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!