आदिवासी विकास विभागातर्फे प्रा. आत्राम यांचा सत्कार
नागपूर : गावातील समस्यांपासून ते आधुनिक शहरी समस्यांची जाणीव असलेले प्रा. डॉ. रामदास आत्राम यांची महु (मध्य प्रदेश) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरील नियुक्ती ही आदिवासी समाज तसेच महाराष्ट्रासाठी भुषणावह बाब आहे. प्रा. आत्राम यांनी आपल्या कार्यातून नवीन आदर्श निर्माण करावा, असे प्रतिपादन आदिवासी आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी केले.
येथील आदिवासी आयुक्त कार्यालयात प्रा. डॉ. रामदास आत्राम यांचा सत्कार समारोह आज आयोजित करण्यात आला. यावेळी ठाकरे बोलत होते. आदिवासी उपायुक्त दशरथ दशरथ कुळमेथे, जात पडताळणी समितीच्या सहआयुक्त बबीता गिरी, अधिक्षक अभियंता उज्वल धाबे, प्रकल्प अधिकारी दीपक हेडावू, सहायक आयुक्त नयन कांबळे, सेवानिवृत्त अपर आयुक्त एम.एम. आत्राम, ॲड. राजेंद्र मरसकोल्हे, मधुकर उईके, प्रा. डॉ. दिलीप दिलीप लट्ये, आर.डी.आत्राम, डॉ. पुरूषोत्तम मडावी, महेश जोशी याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रा. डॉ. रामदास आत्राम यांनी सत्काराला उत्तर देतांना आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत तेथे निष्ठेने काम करण्याचे व यशप्राप्तीसाठी सतत कार्यमग्न राहणे आवश्यक असल्याचे सांगितले.
आदिवासी उपायुक्त दशरथ कुळमेथे यांनी प्रास्ताविकेतून प्रा. डॉ. रामदास आत्राम यांचा परिचय करून दिला. प्रा. मडावी हे सध्या शासकीय फॉरेन्सीक विज्ञान संस्था येथे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठात रजिस्टार, इस्माल युसुफ कॉलेज मुंबई येथे प्राचार्य, नागपूर विद्यापीठात भौतिकशास्त्र विषयाचे रिडर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज नागपूर येथे प्राध्यापक, यासह विविध प्रशासकीय पदावर काम केले आहे. त्यांनी भौतिकशास्त्रात पी.एच.डी. पुर्ण केली असून त्यांचे 37 शोधप्रबंध प्रकाशीत झाले आहे. तसेच त्यांनी नऊ आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग नोंदविला असल्याची माहिती कुळमेथे यांनी दिली.
यावेळी उपस्थित मान्यवरांना आपले मनोगत व्यक्त करून आत्राम यांना शुभेच्छा दिल्या.
उपस्थितांचे आभार गिरीजा उईक यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला आदिवासी विकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.