मुंबई :- पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग (बालसुधार) पुणे (येरवडा)येथील केंद्राला महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी गुरुवारी रात्री अचानक भेट देत बालसुधारगृहात मुलांना प्रत्यक्ष मिळणाऱ्या सुविधांची पाहणी केली.
भेटी दरम्यान मुलांची निवासाची सुविधा, त्यांना देण्यात येणारे भोजन यासह अन्य सुविधांसह सरकारकडून देण्यात येणारी मदत आणि बालसुधारगृहात मुलांना प्रत्यक्ष देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती डॉ. नारनवरे यांनी घेतली.
बालसुधारगृहातील २२ विधि संघर्षग्रस्त मुलांशी आयुक्त डॉ. नारनवरे यांनी संवाद साधत त्यांची विचारपूस केली. तसेच ज्या ठिकाणी मुले राहतात त्यांचे लॉकर्स, स्वच्छतागृहाची तपासणी केली. याशिवाय स्वयंपाकगृहाची पाहणी आयुक्त डॉ. नारनवरे यांनी केली.
यावेळी बालविकासचे उपायुक्त राहुल मोरे, रचना व कार्यपद्धती अधिकारी गोविंद इसानकर, पंडित जवाहरलाल नेहरू उद्योग (बालसुधार) केंद्राचे अधीक्षक दत्तात्रय कुटे, उपअभियंता नितीन पवार उपस्थित होते.