दापोरी :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयातील, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार-२०२४ नुकताच जाहीर करण्यात आला. त्यामध्ये शिक्षक प्रवर्गातून भारतीय महाविद्यालय अमरावती येथे राज्यशास्त्र विभाग प्रमुख तथा सिनेट सदस्य डॉ प्रशांत विघे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आल्यामुळे हजारो विद्यार्थी, मित्र मंडळ व नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा २०२४ चा उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करणारे मोर्शी तालुक्यातील दापोरी येथील डॉ. प्रशांत विश्वेश्वर विघे यांना जाहीर होणे हा एका कर्तुत्वशील व्यक्तीचा सन्मान आहे.
हा पुरस्कार विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या हजारो प्राध्यापकांमधून डॉक्टर प्रशांत विघे यांची झालेली निवड ही विशेष बाब आहे. अनेकांमधून कोणी एक आपल्या कर्तृत्वामुळे इतरांपेक्षा वेगळा सिद्ध होतो. तेव्हाच अशा बहुमानाचा तो मानकरी ठरत असतो. त्यामुळे डॉक्टर प्रशांत विघे यांना हा बहुमान प्राप्त झाला आहे.
आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत त्या क्षेत्रात आपली विशेष छाप निर्माण कशी करता येईल या दृष्टीने ते सतत प्रयत्नरत असतात. याचा प्रत्यय हा वेळोवेळी जाणवतो.
एक अभ्यासू प्राध्यापक म्हणून सर्व परिचित असलेले डॉक्टर प्रशांत विघे हे उत्कृष्ट लेखक सुद्धा आहे. त्यांनी तब्बल २५ पुस्तके लिहिली आहेत. तीन पुस्तके संपादित केली आहे आणि बारा पुस्तकांमध्ये त्यांचे प्रकरणे प्रकाशित झाली आहे. सोळा वर्षांच्या अध्यापनाच्या कारकिर्दीत त्यांचे मोलाचे कार्य आहे. अमरावती विद्यापीठात आचार्य पदवीचे मार्गदर्शक म्हणूनही ते कार्यरत असून त्यांच्या हाताखाली चार विद्यार्थ्यांनी आचार्य पदवी प्राप्त केली असून पाच विद्यार्थ्याचे संशोधन सुरू आहे. महाराष्ट्रातील इतरही अनेक विद्यापीठांच्या प्राधिकरणावर सदस्य म्हणून ते कार्यरत आहे.
एक अभ्यासू वक्ता म्हणूनही त्यांची ओळख असून अनेक सेमिनार, कार्यशाळा आणि परिसंवादात आजवर त्यांनी सत्तरच्या वर व्याख्याने केली आहेत. चाळीसच्या वर संशोधन पेपर लिहिले असून त्यांच्या संशोधन पेपरला उत्कृष्ट संशोधन पेपर म्हणून पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. IPSA, महाराष्ट्र राज्यशास्त्र लोकप्रशासन परिषद, विदर्भ राज्यशास्त्र परिषद, भा. ल. मोठे विचार मंच, डॉ. पेशवे फाउंडेशन यासारख्या राज्यशास्त्रातील मानाच्या आणि महत्त्वपूर्ण संस्थेसोबत विविध पदांच्या माध्यमातून ते जोडल्या गेले आहेत. एक कुशल नेतृत्व म्हणूनही ते सामोरे आलेले आहे. मागील वर्षी झालेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट आणि अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत ते बहुमताने निवडून आले आहे.
प्राध्यापकाने निव्वळ अध्यापनापुरते मर्यादित न राहता आपण समाजाचे काही देणे लागतो. या भावनेतून जगणे गरजेचे असते. डॉ. प्रशांत विघे हे असेच समाजभान जपणारे व्यक्तिमत्व आहे. रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, कोरोना लसीकरण शिविर, रस्ते सुरक्षा सप्ताह, एड्स जनजागृती अभियान, पर्यावरण पूरक कार्यक्रम, मतदार जनजागृती अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करून समाजाशी ते जोडलेले आहेत.
त्यांनी केलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला नुकताच जाहीर झालेला उत्कृष्ट सेवा पुरस्कार त्यांच्या कर्तुत्वाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवणारा आहे. हा पुरस्कार १ मे २०२४ रोजी संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे डॉ.मिलिंद बाराहाते कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती व विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात येणार असून उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्काराकरिता निवड झाल्याबद्दल प्रा. डॉ प्रशांत विघे यांचे हजारो विद्यार्थी मित्र मंडळ व नागरीकांतर्फे अभिनंदन केल्या जात आहे.