पुणे मनपामधील पाणीपुरवठा आणि मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यास प्राधान्य – उदय सामंत

नागपूर, दि. 23 : पुणे शहरासाठी समान पाणीपुरवठा योजना प्रकल्पांतर्गत कामे सप्टेंबर २०२३ पूर्वी आणि राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत पुणे शहरातील मुळा-मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रित करणे या प्रकल्पाची कामे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येतील. ही कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य सुनील कांबळे यांनी यासंदर्भात आज लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री उदय सामंत बोलत होते.

ते म्हणाले की, पुणे शहर हे भौगोलिकदृष्ट्या उंच व सखल भागांमध्ये विभागलेले आहे. त्यामुळे काही भागांमध्ये जादा दाबाने व जादा वेळेसाठी पाणी उपलब्ध आहे व काही भागामध्ये अत्यल्प पाणीपुरवठा करण्यात येतो. त्याअनुषंगाने पुणे शहरासाठी समान पाणी पुरवठा योजना २४x७ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुणे महानगरपालिकेने हाती घेतला आहे. या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने टाक्या बांधणे, मुख्य दाब नलिका टाकणे, अस्तित्वातील वितरण व्यवस्थेचे पुनरूत्थान करणे, पंपिंग स्टेशन्स बांधणे तसेच नागरिकांच्या नळजोडांवर एएमआर मीटर्स बसविणे आदी बाबींचा अंतर्भाव आहे. हा प्रकल्प राबविण्याकरीता पाण्याच्या साठवण टाक्या बांधण्याकरीता एक निविदा, मुख्य दाब नलिका टाकण्याकरीता एक निविदा व शहराच्या जलशुध्दीकरण केंद्रनिहाय पाच निविदा, अशी ७ निविदांची प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. या निविदांपैकी पाण्याच्या ८२ साठवण टाक्यांपैकी आज अखेर ४२ टाक्यांची कामे पूर्ण झालेली असून २२ टाक्यांची कामे प्रगतीपथावर असून, टप्प्याटप्प्याने माहे सप्टेंबर २०२३ अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

याशिवाय, राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत पुणे शहरातील मुळा-मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रित करणे या प्रकल्पाची निविदा मान्य झाली असून कार्यादेश देण्यात आलेले आहेत. या प्रकल्पांतर्गत प्रामुख्याने एकूण ११ मैलापाणी शुध्दीकरण केंद्रे बांधणे (एकूण क्षमता ३९६ एम.एल.डी.) व ५५ कि.मी. लांबीच्या मलवाहिन्या टाकणे प्रस्तावित आहेत. या ११ मैलापाणी शुध्दीकरण प्रकल्पांपैकी नायडू हॉस्पिटल (१२७ एम.एल.डी.), भैरोबा (७५ एम.एल.डी.), धानोरी (३३ एम.एल.डी.), वडगाव (२६ एम.एल.डी.) या मैलापाणी शुध्दीकरण केंद्रांची कामे जागेवर सुरू करण्यात आलेली आहेत. तसेच ५५ कि.मी. लांबीच्या मलवाहिन्या टाकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे काम विहित मुदतीत मार्च २०२५ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन असून योजना कार्यान्वित झाल्यानंतर नदीचे प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली.

लक्षवेधी वरील या चर्चेत सदस्य भीमराव तापकीर यांनी सहभाग घेतला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विधानपरिषदेत दिवंगत मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडला शोक प्रस्ताव

Fri Dec 23 , 2022
नागपूर, दि. 23 :- विधानसभेच्या सदस्या मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने त्यांना विधानपरिषदेमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडलेला शोक प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या शोकप्रस्तावात डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, दिवंगत मुक्ता शैलेश टिळक यांचा जन्म १७ ऑगस्ट १९६५ रोजी मध्यप्रदेश राज्यातील ग्वाल्हेर येथे झाला. त्यांचे शिक्षण एम. ए. (मानसशास्त्र), डी. बी. एम., डी. एम. एम. पर्यंत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com