Ø जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बॅंकर्स समितीचा आढावा
Ø माघारलेल्या बॅंकांना प्रगती वाढविण्याच्या सूचना
यवतमाळ :- आर्थिकदृष्ट्या दुर्बल, कमकुवत लाभार्थ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी शासनाच्या विविध विभागाच्यावतीने अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. यातील काही योजना अतिशय महत्वाच्या आहे. अशा शासनाच्या फ्लॅगशीप योजनांची कर्ज प्रकरणे बॅंकांनी प्राधान्याने मंजूर करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केल्या.
महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंकांच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला भारतीय रिजर्व बॅंकेचे व्यवस्थापक हितेश गणवीर, जिल्हा अग्रणी प्रबंधक अमर गजभिये, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व सर्व राष्ट्रीय, सहकारी, खाजगी बॅंकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, केंद्र शासनाच्या विविध सुरक्षाविषयक योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, पीएम सुर्यघर योजना, पीएम स्वनिधी योजना यासोबतच राज्य शासनाचे विविध विभाग व महामंडळाच्या रोजगार, स्वयंरोजगार निर्माण करणाऱ्या योजनांचा समावेश आहे. बॅंकांना योजनेंतर्गत कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट निश्चित करून दिल्यानंतर ते पुर्ण झाले पाहिजे. विशेष: शासनाच्या फ्लॅगशीप योजनांना प्राधान्य देण्यात यावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
विभागांकडून प्रस्ताव बॅंकांना प्राप्त झाल्यानंतर बॅंकांनी त्यावर तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. प्रकरणे काही कारणास्तव नामंजूर होत असल्यास प्रलंबित न ठेवता खारीज करावे. परंतू दिलेले उद्दिष्ट पुर्ण होईल, याची खात्री बॅंकांनी करणे आवश्यक आहे. विभागांनी बॅंकांकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर व्यक्तीश: प्रकरणांचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. केवळ प्रस्ताव बॅंकांकडे पाठवून चालणार नाही, असे जिल्हाधिकारी सूचना देतांना म्हणाले.
रोजगार, स्वयंरोजगाराच्या योजनांमधून समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न होत असतो. त्यामुळे कर्ज प्रकरणांकडे बॅंकांनी सकारात्मक भावनेने बघितले पाहिजे. नेहमीपेक्षा जास्त काम करून जास्तीत जास्त नागरिकांना कसा दिलासा देता येईल, याचा विचार देखील बॅंकांनी करावा. ज्या बॅंकांची कामगिरी समाधान कारण आढळणार नाही, अशा बॅंकांच्या वरिष्ठांना याबाबत कल्पना दिली जातील, असे जिल्हाधिकारी म्हणाले.