नागपूर :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हिंदु नववर्षदिनी, गुढीपाडव्याला रविवार ३० मार्च रोजी नागपूर शहरात आगमन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावर आगमन झाल्यानंतर रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन, त्यानंतर दीक्षाभूमी आणि तिथून माधव नेत्रालय येथे जाणार आहेत.
पंतप्रधानांच्या नियोजित दौऱ्याच्या अनुषंगाने नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दौऱ्यातील संपूर्ण मार्गाची पाहणी केली. या संपूर्ण मार्गावर भेट देऊन मनपा व पोलिस प्रशासनाद्वारे पाहणी करण्यात आली व आवश्यक ते निर्देश देण्यात आले. यावेळी पोलिस सहआयुक्त निसार तांबोळी, अपर पोलिस आयुक्त संजय पाटील, मनपा अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, विमानतळ प्रशासन, दीक्षाभूमी आणि माधव नेत्रालय येथील प्रतिनिधी उपस्थित होते.