महासंस्कृती महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

Ø महोत्सवासाठी रामटेक सजले

Ø स्थानिक कलाकारांचा कसून सराव

नागपूर/रामटेक :- महासंस्कृती महोत्सवासाठी महाकवि कालिदास भूमी रामटेक नगरी सज्ज होत आहे. येथील नेहरू मैदानावर भला मोठा मंच, एलईडी वॉल्स, लेझर शोसाठी हाय व्होल्टेज लाईट्स अशी तयारी अंतिम टप्यात आली आहे. स्थानिक 45 कलाकारांचा समावेश असणाऱ्या रामायण नृत्य नृत्य नाटिकेसाठी तसेच विविध आदिवासी नृत्य सादरीकरणासाठी कलाकार कसून तयारी करीत आहेत.

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने राज्यभर आयोजित होणाऱ्या महासंस्कृती महोत्सवाची सुरुवात रामटेक येथून 19 जानेवारीला होत आहे. 23 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या येथील महोत्सवात सुप्रसिद्ध नृत्यांगना हेमा मालिनी, सुविख्यात गायक सुरेश वाडकर, कैलाश खेर, हंसराज रघुवंशी यांचे सादरीकरण होणार आहे. या सोबतच स्थानिक कलाकारांचेही सादरीकरण होणार आहे. रामटेक येथील रामधाम नटराज कलावंत गृपचे 45 कलावंत रामायण नृत्य नाटिका सादर करणार आहेत. या नाटिकेची सुरूवात लव-कुश यांच्याद्वारे राम कथा गायनाने होणार असून राम जन्म सीता स्वयंवर रामाचा वनवास अयोध्या पुनरागमन असे प्रसंग सादर होणार आहेत. रामाच्या राज्याभिषेकाने या नाटकाचा समारोप होईल.

यासोबतच स्थानिक आदिवासी कलावंतांचे वैविध्यपूर्ण आदिवासी नृत्य सादर होणार आहे. या सादरीकरणासाठी कलाकारांची कसून मेहनत सुरू आहे.

१००x ८० फुट आकाराचा रंगमंच तयार होत आहे. रंगमंचावर ८०x १६ फुटांची एलईडी उभारण्यात येत आहेत. मैदानावर २०x १० फुट आकाराच्या तीन व ४०x१५ फुट आकाराच्या दोन एलईडी उभारण्यात येत आहेत. अयोध्येतील राम मंदिराची 52 फुट उंच प्रतिकृती आणि यज्ञकुंड उभारले जात आहे. महोत्सवासाठी येणाऱ्या पाहुण्यांचे व जिल्ह्यातील नागरिकांच्या स्वागतासाठी शहरात ठिक-ठिकाणी कमानी व देखावे उभारण्यात येत आहेत.

महासंस्कृती महोत्सवाचाच भाग असणारा फूड कोर्ट आणि बचत गटांचे स्टॉल्स येथील राखी तलाव परिसरात उभारले जात आहेत. त्या महोत्सवा अंतर्गत 22 जानेवारी रोजी वनविभागाच्यावतीने प्रभू श्रीराम आणि रामटेक गड मंदिर परिसर, निसर्गरम्य रामटेक आणि रामटेक परिसरातील ऐतिहासिक स्थळ विषयावर खुली चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या महोत्सवासाठी गड किल्ल्यावर खास रोषनाई करण्यात येणार आहे.

कवि कालिदासांवरील प्रबोधन चर्चासत्र, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे महा खिचडीचे प्रात्यक्षिक,लेझर शो, फायर शो, नौका स्पर्धा ,फोटोग्राफी व पेंटिंग स्पर्धा, स्केटिंग स्पर्धा, एयरोमॉडलिंग शो, फुड फेस्टिवल आणि दिग्गज कलाकारांचे सादरीकरण अशी खास पर्वणी नागपूर जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत येत्या 19 जानेवारी रोजी सायंकाळी 7.00 वाजता या महोत्सवाचे राज्यस्तरीय उद्घाटन होणार आहे. नागपूर जिल्हा प्रशासनाने यापूर्वी 13,14,15 जानेवारी रोजी महानाट्य जाणता राजा नागपूर शहरात आयोजित करून महानाट्य महोत्सवाचा राज्यस्तरीय शुभारंभ केला होता त्यानंतर आता रामटेक येथून हा राज्यस्तरीय संस्कृती महोत्सव सुरू होत आहे. त्यानंतर राज्याच्या इतर भागात हा महोत्सव सुरू होईल.

राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या महोत्सवातील विविध विविध स्पर्धांसह सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना निवडणूक आयोगामार्फत राष्ट्रीय पुरस्कार

Thu Jan 18 , 2024
नागपूर :- भारत निवडणूक आयोगांकडून आज निवडणुकीच्या सुधारणांसंदर्भात जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातून नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांना ‘बेस्ट इलेक्ट्रॉल प्रॅक्टिस अवार्ड 2023 ‘ घोषित करण्यात आला आहे. निवडणुकांमध्ये मतदार संख्या वाढविण्यासाठी डॉ. विपिन इटनकर यांनी ‘मिशन युवा ‘ अभियान राबविले होते. या अभियाना अंतर्गत त्यांनी 15 जुलै 2023 ते जानेवारी 2024 या काळामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला लक्षात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com