संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– नैसर्गिक आपत्ती ,आर्थिक अडचणीत शेतकरी
कामठी :- कामठी तालुक्यात उन्हाचा प्रकोप असला तरी कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यास दूर ठेवत रखरखत्या उन्हात शेती कामे करण्यास सुरुवात केली आहे.अवघ्या महिनाभरात पेरणी करावी लागणार असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागात शेती मशागतीला वेग आल्याचे दिसत आहे.
मागील काही वर्षापसून सतत दुष्काळ,वादळी वाऱ्यासह गारपीट याप्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील शेतकरी राजा होरपळून गेला होता तरी शेतकरी राजा एका नव्या उमेदीने शेती कामात व्यस्त झाला आहे. ही झुंज देत शेतकरी पुन्हा खरिपाच्या पेरणीचे नियोजन करीत असल्याचे दिसून येत आहे. सध्या उन्हाचा पारा वाढला असला तरी बळीराजा, नांगरणी, वखरणी, शेणखत टाकणे, काटेरी झुडपे तोडणे, बांध दुरुस्ती आदी कामात मग्न झाला आहे. कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला जोडधंदा तथा पुरेशी सिंचन व्यवस्था नसल्याने येथील शेतकऱ्यांना खरीप हंगामावर जास्त प्रमाणात अवलंबून राहावे लागते त्यामुळे येथील शेतकऱ्यावर सतत कर्जाचा डोंगर उभा झाला आहे तरीसुद्धा कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा शेतीचा जुगार खेळण्याकरिता कंबर कसली असून त्यांनी शेती मशागतीच्या कामाला वेग दिला आहे.शेतकरी शेती मशागतीच्या कामाला लागला असतानाच रासायनिक खतांच्या किमती गगनाला भिडल्याचे दिसून येत आहे. खरे पाहता शेतकऱ्यांचा आज पर्यंत शासनाच्या हमी भाव मृगजळच ठरत आला आहे.शेती साहित्य, बी बियाणे, रासायनिक खत, किटनाशकासह आता तर शेतात काम करणाऱ्या सालगडयाचे सुद्धा भाव वधारल्याने उत्पादन खर्चाच्या तुलनेत हमी भाव नगण्यच म्हणावा असा आहे.
अनेक शेतकऱ्याकडे सध्या पीक असले तरी खर्चासाठी नगदी रकमेची उणीव जाणवत होती. शेती कामे करण्यातही अडचणी निर्माण झाल्या होत्या. अनेक शेतकऱ्याच्या घरात कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा यांची विक्री न झाल्यामुळे वार्षिक ताळमेळ बिघडत असून आर्थिक व्यवहरासाठी लागणाऱ्या रकमेसाठी कसरत करावी लागत आहे .शेतीसंबंधी वस्तू खरेदी करण्यातही अडचणी येत आहे.अशा स्थितीतही तोंडावर येत असलेला खरीप हंगामासाठी शेतकरी शेत मशागतीची जोरदार तयारी करीत असल्याचे चित्र कामठी तालुक्यात पाहावयास मिळत आहे.
सध्या बियाणे, खते, यंत्रे आदीचे दर वाढले असल्याने शेतकऱ्यांना शेती कामे करणे अवघड जात आहे.कसे बसे आलेल्या पिकानाही योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतातील कामे करण्यासाठी लागणारा खर्च ही निघत नसल्याने तसेच वातावरण बदलामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर येत असल्याने विविध कामावर याचा परिणाम झाल्याचे पहावयास मिळते. शासनाने पेरणीपूर्व मशागत कामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे.