“तुच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार” वर व्याख्यान
नागपूर :- सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात ताणतणाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे, कोरोना नंतर तर तणावाचे प्रमाण १५ टक्क्यांनी अधिक झाले आहे. अशात ताणतणाव विरहित आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक विचार आणि सकारात्मक वृत्ती मनात ठेवेने अत्यंत महत्वाचे आहे. सकारात्मक विचार आणि वृत्ती ही आनंदी आयुष्याची खऱ्या अर्थाने गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन विख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. दिलीप पटवर्धन यांनी केले.
कार्यालयीन कामकाज करतांना दिवसेंदिवस वाढणाऱ्या ताणतणावामुळे कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो, तो होवू नये व सकारात्मक वृत्ती अधिक बळकट व्हावी, या हेतूने मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नागपूर महानगरपालिका आणि जीवनविद्या मिशन मुंबई, शाखा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जीवनविद्या तत्वज्ञानावर मार्गदर्शनपर व्याख्यानमाले अंतर्गत “तुच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार’ या विषयावर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन महाल स्थित राजे रघुजी भोसले सभागृह टॉऊन हॉल येथे करण्यात आले.
कार्यक्रमाला नागपूर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश राठोड, निगम सचिव डॉ. रंजना लाडे, जीवनविद्या मिशन नागपूर शाखेचे अध्यक्ष सतीश देशमुख, सचिव विठ्ठलराव जवळकर यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
आयुष्याला तणावमुक्त करण्यासाठी डॉ. दिलीप पटवर्धन यांनी तणावमुक्ती आणि आनंदी आयुष्य जगण्याचा मुलमंत्र सांगितला. डॉ. पटवर्धन म्हणाले, तणावाबद्दलची सर्वात दिलासा देणारी गोष्ट म्हणजे तणावाचे खरे मूळ हे आपल्याच मनांमध्ये दडलेले आहे. त्यामुळे पर्यायाने तणावमुक्ती आपल्याच हाती आहे. बाहेरची परिस्थिती जरी प्रतिकूल असली तरी त्याला कशा प्रकारे प्रतिसाद द्यायचा हे निवडण्याची क्षमता आपल्या तणावमुक्त आयुष्याचा मूलमंत्र आहे.
मनुष्याच्या जीवनात तणावाची सुरुवात ही सर्वप्रथम तुलनेने होते. अपेक्षा वाढत चालल्या आणि आपली क्षमता कमी पडत असेल तर तणाव वाढतो हे साहजिकच आहे. क्षमता ही आपल्या कौशल्याचे वाढविता येते, प्रत्येक व्यक्ती वेगळा आणि बुद्धिवान आहे. त्यामुळे आपल्यात दडलेल्या सुप्त कलागुणांना ओळखा, आपल्यात काय आहे ? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा, स्वतःची तुलना स्वतःशी करा, दररोज मी काल पेक्षा आज किती चांगल करून दाखवू शकतो याकडे अधिक लक्ष द्या. इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःशी स्पर्धा करा, इतरांचा द्वेष करणे टाळा, असे केल्यास तुम्हाला आनंदाची अनुभूती होईल. सुख आणि आनंद हा मिळविण्याची बाब नसून, ती देण्याची गोष्ट आहे. आनंद हवा असेल तर तो आधी इतरांना द्यावा लागतो, तेव्हाच आपल्यालाही आनंदानुभूती होते. असे सांगत डॉ. पटवर्धन यांनी सकारात्मक विचारांनाचे आयुष्यात होणारे फायदे सांगितले. ते म्हणाले की, आपला विचार ही आपल्या जीवनाची विद्या आहे. प्रत्येका प्रती चांगले विचार ठेवा. जशी क्रिया तशी प्रतिक्रिया असा सिद्धांत आहे. क्रियेचे मूळ हे विचारात असते. वाईट विचार केल्यावर वाईट क्रिया घडेल आणि चांगला सकारात्मक विचार असेल तर चांगली क्रिया घडेल त्याचे परिणाम ही चांगलेच असतील. तसेच तणावमुक्त राहायचे असेल तर प्रतिक्रिया देणे बंद करा, असा सल्ला देत डॉ. पटवर्धन यांनी प्रत्येकाने वर्तमान काळात जगायला शिकायला हवं असे सांगितल. ते म्हणाले की, व्यक्ती नेहमी वर्तमानकाळात भूतकाळातील चुकीच्या आठवणींचे चिंतन करत असतो. परिणामी भविष्य काळ बिघडतो. वर्तमानात जगायला शिकल्यास भविष्य ही अधिक आनंदी होईल. कामकाज करतांना वाढणाऱ्या ताणतणावामुळे कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो, त्यावर उपाय सांगत डॉ. पटवर्धन यांनी संपूर्ण मन लावून कुठलाही काम केल्यास कधीच तणावाची अनुभूती होणार नसल्यचे सांगितले. याशिवाय तणाव विरहित जगण्यासाठी प्रत्येकाने उत्तम झोप घ्यावी, उत्तम आहार घ्यावा, उत्तम व्यायाम करायला हवा, तणावापासून मुक्ती मिळविण्यासाठी आपल्या दररोजच्या आयुष्यात व्यायामाला महत्त्वाचं स्थान द्यावे. व्यायाम केल्यानं ताण कमी होण्यास मदत मिळते असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
कौटुंबिक आयुष्यात आनंदी राहण्यासाठी कुटुंबातील सदस्यांशी सुसंवाद ठेवावा, घरातील ज्येष्ठांशी दिवसातून एकदातरी स्वतःहून बोलावं, अशा छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यात केल्याने तणाव आपल्या पासून दूर राहील असा महत्वपूर्ण सल्ला त्यांनी उपस्थितीत दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भावना यादव यांनी केले. तर प्रतिभा वराडे यांनी व्याख्यात्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमात मनपा अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.