रामटेक :-देवलापार पोलिसांनी मोठी कारवाई करीत अवैधरीत्या गोवंशाची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडून त्यात क्रूर व निर्दयपणे कोंबून ठेवलेला १९ गोवंशांना जीवनदान दिले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, रामटेकचे उपविभागीय पोलीस अधिकारी हे १ तारखेला सकाळच्या सुमारास देवलापार पोलीस स्टेशन क्षेत्रात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर पोलीस पथकासह पेट्रोलिंग करीत असताना त्यांना काही इसम विनापरवाना व अवैधरित्या गोवंश कोंबून वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करीत घटनास्थळी जाऊन नाकाबंदी केली.तेव्हा महिंद्रा फुरिओ कंपनीचे वाहन क्रमांक एमएच ४०/ सीडी ९८४२ चा चालक आरोपी जितेंद्र उर्फ सोनू राजू देशमुख ( २१,रा.बिस्कान तालुका आमला जिल्हा बैतूल मध्यप्रदेश ),त्रिलोकचंद बालकिसन पाटीदार (४२,रा.खापाखतेडा,तालुका आमला, जिल्हा बैतूल मध्यप्रदेश ),नदीम आलमगीर कुरेशी (२१),समीर भाब्बिर कुरेशी (२०),दोन्ही रा.मोहल्लाटोला भामशाबाद,तालुका फतेहाबाद जिल्हा आग्रा,उत्तरप्रदेश ) यांनी त्यांच्या ताब्यातील वाहनात ९ गायी,६ गोरे व ४ बछडे असे गोवंश हे अतिशय आखूड दोराने एकावर एक रचून त्यांना कोणतीही बसण्याची व चारापाण्याची व्यवस्था न करता वाहतूक करताना मिळून आले.त्यामुळे पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून हे १९ जिवंत गोवंश जप्त करीत त्यांच्यावर पशुवैद्यकीय उपचार केले.नंतर पोलिसांनी या गोवंशांना देवलापार येथील गोविज्ञान अनुसंधान केंद्रात पाठवले. या प्रकरणात फिर्यादी पोलीस नाईक संदीप नागोसे यांच्या तक्रारीवरून देवलापार पोलीस स्टेशन येथे या आरोपींविरुद्ध कलम ११ (१),( घ ),(ड),(च),प्रा.छ.अधी.सहकलम ५( अ ),९ म.प्रा.स का.सहकलम ३४ भादवि,सहकलम १८४,१७९ मोवाका कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी आरोपींना अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केशव कुंजरवाड यांच्याद्वारे करण्यात येत आहे.