कोथुर्णा (ता. सावनेर) :- स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणच्या पथकाने २५ नोव्हेंबर २०२४ रोजी कोथुर्णा गावाजवळ विना परवाना सुरू असलेल्या माती उत्खननाच्या प्रकरणाचा पर्दाफाश केला. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून १५ लाख रुपये किंमतीचा ट्रक (क्र. एम.एच. ४० वाय-२४१५) आणि २० लाख रुपये किंमतीची जेसीबी मशीन (क्र. एम.एच. ४० बीई ४९६४) जप्त केली.
छाप्यादरम्यान, जेसीबी चालक ऋषी बाळवंत बाळापुरे (२१, रा. पटकाखेडी) आणि ट्रक चालक विकास बिहारी उईके (३६, रा. रामडोंगरी) यांना अटक करण्यात आली. घटनास्थळी अंदाजे २००x२०० फूट खोलीचे खड्डे खोदून माती उत्खनन सुरू असल्याचे आढळले.
माहितीनुसार, आरोपींनी उत्खननासाठी कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे मान्य केले. ट्रक मालक अर्जुन जांगडे आणि जेसीबी मालक साहीद सिद्दीकी यांच्या निर्देशानुसार हे उत्खनन सुरू असल्याचे चालकांनी सांगितले.
घटनास्थळाचा पंचनामा तयार करून साक्षीदारांच्या उपस्थितीत सर्व पुरावे नोंदवले गेले. पुढील तपास खापा पोलीस करीत आहेत.
अवैध माती उत्खननामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत असून, या प्रकारामुळे स्थानिक प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेतली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.