– निकिता फार्मा कंपनीचे उद्घाटन
नागपूर :- औषध निर्मितीचे क्षेत्र व्यापक असून भविष्यात त्याचा मोठ्या प्रमाणात विस्तारच होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्याही भरपूर संधी उपलब्ध होणार आहेत, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) व्यक्त केला. बुटीबोरी येथील निकिता फार्मा कंपनीचे उद्घाटन ना. गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार समीर मेघे, माजी खासदार अजय संचेती, रवलीन सिंग खुराणा यांची प्रमुख उपस्थिती होती.
केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत पीएलआय योजनेमध्ये निकिता फार्मा कंपनी पात्र ठरल्याबद्दल ना. गडकरी यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. ‘कंपनीतील उत्पादनांची निर्यात ही व्यवसायाच्या आणि आत्मनिर्भर भारतच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब ठरते. भविष्यात निकिता फार्मा निर्यातीच्या क्षेत्रातही स्वतःला सिद्ध करेल. यासोबतच येत्या पाच वर्षांत रोजगाराच्या मोठ्या संधी स्थानिकांसाठी उपलब्ध करून देईल,’ असा विश्वास ना. गडकरी यांनी व्यक्त केला.