मनरेगाची कामे ऑगस्ट महिन्याअखेर पूर्ण करण्याचे नियोजन करा- संदीपान भुमरे

– कुशल कामांच्या तपासणीसाठी प्रायोगिक तत्वावर प्रकल्प

नागपूर :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) कुशल कामांची देयके ऑगस्ट महिन्याअखेर अदा करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी आज येथे दिले. तसेच, मनरेगाअंतर्गत कुशल कामांच्या प्रस्तावाची प्राथमिक तपासणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर छत्रपती संभाजी नगर येथे प्रकल्‍प राबिविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

मनरेगा आयुक्त कार्यालयात भुमरे यांनी राज्यात मनरेगा अंतर्गत सुरु असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. या आढावा बैठकीस रोजगार हमी योजना विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, मनरेगाचे मिशन महासंचालक नंद कुमार,मनरेगा आयुक्त अजय गुल्हाने, उसचिव संजना खोपडे आणि ज.जी. वळवी तसेच राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मनरेगा अंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक कामाच्या कुशल निधी मागणी प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला. या अंतर्गत रोप वाटिका, सिंचन विहिरी, शोष खड्डे आदिंच्या कामांची माहिती देण्यात आली. या कामांच्या देयकांच्या स्थितीबाबतही भुमरे यांनी माहिती घेतली आणि यासंदर्भातील प्रलंबित प्रस्ताव पूर्ण करण्यासाठी गतीने काम करण्याचे निर्देश दिले. यासाठी आवश्यकतेनुसार संबंधित जिल्हाधिकारी , विभागीय आयुक्त यांच्यासोबत बैठका घ्याव्यात, असेही त्यांनी सांगितले. मनरेगाच्या मंजूर कामांचा निधी अन्य कामांना जाणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही भुमरे यांनी दिले.

मनरेगा अंतर्गत कुशल कामांच्या प्रस्तावाची तपासणी करण्याकरिता महसूल विभाग निहाय विभाग स्तरावर पथक तयार करण्याचे रोहयो विभागाचे नियोजन आहे. हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर सर्व प्रथम औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे राबविण्यात यावा,असे निर्देश भुमरे यांनी दिले. या संदर्भात शासन स्तरावर तातडीने आदेश काढावा असेही त्यांनी सांगितले. मनरेगांच्या कामांची पाहणी करण्याकरिता भुमरे हे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भेटी देणार आहेत. तसेच, राज्यातील मनरेगाच्या कामांबाबत पुन्हा आढावा घेणार असल्याचे त्यांनी या बैठकीत सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रहार मिलिटरी स्कूल रविनगर, येथे क्रांतीदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन 

Wed Aug 9 , 2023
– क्रांती दिन चिरायू होवो नागपूर :- क्रांतीची ज्वलंत धगधगती मशाल हातात घेऊन ब्रिटिश सत्तेच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता आहुती दिली. अशा अमर हुतात्म्यांची आठवण तसेच नव्या पिढीला हुतात्म्यांच्या त्यागाची जाणीव राहावी. यासाठी दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून सी.पी. अँड बेरार एज्युकेशन सोसायटी अंतर्गत येणाऱ्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com