शनिवारच्या पावसातील नुकसानीचे योग्य प्रस्ताव सादर करा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे अधिकाऱ्यांना आवाहन

Ø उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्र्यांकडून सूचना

Ø आमदारांसोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक

Ø अंतिम आराखडा सोमवार पर्यंत सादर करा

Ø नाल्याकाठचे अतिक्रमण काढण्याचे निर्देश

Ø अघटीत नुकसानाचे विशेष प्रस्ताव सादर करा

नागपूर :- शनिवार 23 सप्टेंबरच्या ढगफुटी सदृश्य पावसाने महानगरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रचंड नुकसान केल्याचे पुढे आले आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून आज झालेल्या लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत सोमवारपर्यंत नुकसानाचा अंतिम आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले.

शनिवारी रात्री दोन वाजता पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत केल्याचे समोर येत आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात लोकप्रतिनिधी व जिल्हा यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. नागपूर महानगर, महानगर लगतच्या नगरपालिका तसेच ग्रामीण भागातील वेगवेगळ्या तालुक्यात झालेल्या नुकसानीचा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात सोमवार पर्यंत एकत्रित करून सादर करण्याचे आवाहन यावेळी लोकप्रतिनिधींनी केले.

आजच्या आढावा बैठकीला आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, टेकचंद सावरकर, समीर मेघे, आशिष जायस्वाल, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, महानगरपालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल,नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, महानगरपालिकेचे उपायुक्त, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.

या बैठकीमध्ये लोकप्रतिनिधीमार्फत काही सूचना प्रामुख्याने आल्या. यामध्ये शहरातील अंबाझरी तलावानजीच्या सर्व वस्त्यांमध्ये स्वच्छता अभियान आणखी गतिशील करण्यात यावे, आवश्यकता असेल त्या घरमालकाला घर सामान काढण्यासाठी मदत करण्यात यावी, अंशतः नव्हे शक्यतो सरसकट मदत करावी, नाल्या शेजारचे सर्व अतिक्रमण काढण्यात यावे, शहरालगतच्या वस्त्यांमधील नाल्यावरील अतिक्रमणे दूर करून पुनर्वसन करण्यात यावे, दीर्घकालीन उपाययोजना अवलंबण्यात याव्या, काही प्रकरणात अधिक नुकसान झाले असेल तर विशेष प्रस्ताव तयार करण्यात यावे, क्षतिग्रस्त झालेल्यांना तातडीने मदत मिळावी बोगस लोकांना मदत करण्यात येऊ नये, शासनामार्फतच अधिकृत फॉर्म भरण्यात यावे, खाजगी स्तरावर भरण्यात आलेल्या फॉर्म संदर्भासाठी वापरावे, अत्यावश्यक दस्ताऐवज पुन्हा निर्मितीसाठी शासकीय यंत्रणेने मदत करावी,काही घरे सुटली असल्याचे लक्षात आल्यावर पुन्हा पंचनामे करावे, हिंगना परिसरातील नाल्यांवरील आच्छादने तातडीने लावावी,तुटलेले पुल लवकर तयार करण्यात यावे,सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांनी मदत व पुनर्वसन कामांमध्ये गतीने पुढे यावे,ग्रामीण भागातील शेतीच्या नुकसानीचा सर्वे देखील तातडीने पूर्ण करावा,जानमालाच्या नुकसाना संदर्भात तातडीने भरपाई देण्यात यावी.

ग्रामीण व शहरी भागातील एकत्रित आकडेवारी सोमवार पर्यंत सादर करण्याचे निर्देश यावेळी लोकप्रतिनिधीमार्फत जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्य शर्मा यांनी सर्व उपविभागीय अधिकारी,मुख्याधिकारी, तसेच तहसीलदार यांना दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

माहितीचा अधिकार दिनानिमित्त कार्यशाळा उत्साहात माहिती अधिकार दिन साजरा

Thu Sep 28 , 2023
नागपूर :- 28 सप्टेंबर जागतिक माहिती अधिकार दिनानिमित्त कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी होते. मार्गदर्शक म्हणून यशदाचे मार्गदर्शक तथा माहिती अधिकार तज्ज्ञ प्रा. विनोद सायरे तर उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोदवड उपस्थित होते. सामान्य नागरिकांना योग्य ती माहिती माहिती अधिकार कायद्यान्वये मिळावी व कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने ही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!