‘जिंदाल’ दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी पाच लाखांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : जिंदाल कंपनीतील दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या वरसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत राज्य शासनाकडून दिली जाणार आहे, तर जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.            नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात मुंढेगाव शिवारात असलेल्या जिंदाल कंपनीत आज रविवार रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या स्फोटानंतर आग लागली. या आगीत दोन कामगारांचा मृत्यू झाला. अन्य १७ कामगार जखमी झाले आहेत.            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येवून भेट देत पाहणी केली. त्यानंतर त्यांनी दवाखान्यात जाऊन जखमी कामगारांची विचारपूस केली. यावेळी बंदरे व खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन.डी., मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जिंदाल कंपनीत लागलेल्या आगीचे मुख्य कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र याबाबत उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. या आगीत १९ कर्मचारी जखमी झाले असून यापैकी दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये राज्य शासनाकडून मदत देण्यात येणार आहे. तसेच जखमींवर राज्य शासनामार्फत मोफत उपचार करण्यात येणार आहेत.

 

 

Email Us for News or Artical - [email protected]ail.com
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com