दारव्हा :- समाजकारण आणि राजकारण करताना आपण कधीही कोणाची जात, पात, धर्म, समाज बघून काम केले नाही. सर्व समाजबांधव माझ्यासाठी समान आहे. आज दिग्रस, दारव्हा, नेर तालुक्यातील सकल कुणबी समाजाने स्वयंस्फूर्तीने कार्यक्रम घेवून जे आशीर्वाद दिले, त्याने मी भावविवश झालो आहे. प्रेम करणाऱ्या जनतेचे हेच आशीर्वाद मला कायम लढण्याचे बळ देते, असे भावोद्गगार राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी काढले.
दारव्हा येथील शिव लॉनमध्ये संजय राठोड यांच्या समर्थनार्थ सर्व शाखेय कुणबी समाजाच्या वतीने सोमवारी सकल कुणबी समाज सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जीवन पाटील, डॉ. शीतल वातीले, सोपलकर महाराज, दशरथ खाटीक, सुभाष भोयर, कालिंदाताई पवार, मनीषा गोळे, बाळासाहेब दौलतकार, स्नेहल भाकरे, सुधीर देशमुख, राहूल शिंदे, समीर माहुरे, ठवकार मामा, पिंटू खोडे, प्रवीण पवार, यशवंत पवार, उमेश गोळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना संजय राठोड म्हणाले की, आपल्याला दिग्रस मतदारसंघात सर्व जनतेने कायमच साथ दिली आहे. कुणबी समाज नेहमीच आपल्या पाठीशी राहिला आहे. कुणबी समाजाची सचोटी, प्रामाणिकपणा आणि निष्ठा मला सामाजिक आणि राजकीय जीवनात अत्यंत उपयोगी पडत आहे. मी जेवढे समाजाला दिले त्यापेक्षा अधिक भरभरून या समाजाने आपल्याला दिले आहे. या उपकारांची परतफेड या आयुष्यात शक्य नाही. मी सकल कुणबी समाजाच्या ऋणातच राहू इच्छितो, असे संजय राठोड म्हणाले. यावेळी उपस्थित चार ते पाच हजार समाजबांधवांनी हात उंचावून संजय राठोड यांना समर्थन दिले. यावेळी जीवन पाटील, डॉ. शीतल वातीले, सोपलकर महाराज, दशरथ खाटीक, कालिंदा पवार, मनीषा गोळे यांनीही विचार मांडले. या सभेस सर्व शाखेय कुणबी समाजातील पुरूष, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.