लोकाभिमुख प्रशासनामुळे विकास कामांमध्ये लोकांचा सहभाग वाढला – प्राजक्ता लवंगारे-वर्मा

  •  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘वेब संवाद’ उपक्रम
  •  जिल्हा माहिती कार्यालय, महा-आयटीकडून आयोजन

                 नागपूर, दि. 08 : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रशासकीय कामकाजाच्या पद्धतीमध्ये बदल होत जावून लोकाभिमुख प्रशासनाची संकल्पना अस्तित्वात आली. यामध्ये लोकांचे म्हणणे ऐकून घेवून त्यांची शक्तीस्थळे, आव्हाने जाणून घेवून त्यानुसार योजना कार्यान्वित करण्यावर भर दिला जावू लागला. त्यामुळे अनेक योजनांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, त्यांनी स्वतःहून सहभाग नोंदवून आपल्या कल्पनाशक्ती, सृजनशीलतेचा वापर करून योजना यशस्वी केल्या असल्याचे विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी सांगितले.

            स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय व महा-आयटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वेब संवाद’ या ऑनलाईन कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती लवंगारे-वर्मा यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘लोकाभिमुख प्रशासन : स्वातंत्र्योत्तर भारत’ या विषयावर त्यानी आपले विचार मांडले. यावेळी जिल्हाधिकारी आर. विमला, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, माध्यम समन्वयक अनिल गडेकर  उपस्थित होते.

            स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये प्रशासन केवळ महसूल जमा करणे आणि कायदा व सुव्यवस्था राखने यापुरते मर्यादित होते. स्वातंत्र्यानंतर कल्याणकारी राज्याची संकल्पना अस्तित्वात येवून लोकांच्या कल्याणासाठी प्रशासन काम करू लागले. पूर्वी लोकांना लाभार्थी समजून योजना राबविल्या जात होत्या. 1952 नंतर सुरु झालेल्या समूह विकास कार्यक्रमामुळे लोकाभिमुख प्रशासनाची बीजे रुजली. योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला जावू लागला. आता लोकाभिमुख प्रशासनामध्ये लोकांना योजनेत सहभागी करून घेवून त्यांच्या गरजा लक्षात घेवून योजना राबविली जात आहे. त्यामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळाली आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान हे त्याचे उत्तम उदाहरण आहे, असे श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी सांगितले.

            विकासात्मक योजनांसह आपत्ती व्यवस्थापनासारख्या बाबींमध्येही लोकांचा सहभाग वाढविण्यावर लोकाभिमुख प्रशासनात भर दिला जात आहे. त्यामुळे वित्त, जीवित हानी टाळण्यामध्ये लोकांची मदत होवू लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. कुपोषण, दुष्काळ आदी संकटांचा सामना करण्यासाठीही लोकांच्या सहभागातून चांगली कामे झाली. लोकांचा सहभाग असलेली योजना, अभियान अधिक प्रभावीपणे राबविले जाते आणि ते यशस्वी होते, याची अनेक उदाहरणे आहेत, असे श्रीमती लवंगारे-वर्मा यांनी सांगितले. आतापर्यंतच्या प्रशासकीय कारकिर्दीत लोकाभिमुख प्रशासनासाठी स्वतः केलेल्या प्रयोगांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

            नागपूर जिल्हा माहिती कार्यालयामार्फत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी  वर्षानिमित्त  राबविण्यात येत असलेल्या ‘वेब संवाद’ चर्चासत्रात विविध क्षेत्रात तज्ज्ञ व्यक्ती दर आठवड्यात गुरुवारी चार ते पाच या काळात संवाद साधणार आहेत. देशाच्या अमृतमहोत्सवी  वर्षांमध्ये  लोकाभिमुख प्रशासन, संविधानाची फलनिष्पत्ती , सामाजिक समता,  भारतीय राज्यघटना राष्ट्रनिर्माण, साहित्यिकांची भूमिका , स्वातंत्र्यानंतरचे नागपूर, राष्ट्रनिर्माण आणि विदर्भ, स्वातंत्र्योत्तर काळातील नागपूर, विदर्भातील पत्रकारिता व समाज निर्मिती,  स्वातंत्र्य चळवळ व महिलांचे योगदान,  कृषी क्रांती  आदी विविध विषयांवर तज्ञ व्यक्ती या वेब संवादात सहभागी होणार आहे. जिल्हा माहिती कार्यालयाच्या या उपक्रमाचे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी  कौतुक केले.

            स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी आर. विमला यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा माहिती कार्यालय व महा-आयटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वेब संवाद’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत प्रत्येक गुरुवारी दूपारी 4 ते 5 कालावधीत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती संवाद साधणार असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी यावेळी दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

थंडीत हुडहुडणाऱ्या बेघर बांधवांना मिळाला मनपाच्या निवारागृहाचा सहारा

Thu Dec 9 , 2021
चंद्रपूर : सध्या हिवाळ्यामुळे थंडी वाढली असून, उघड्यावर राहणाऱ्या बेघर बांधवांची गैरसोय होऊ नये, थंडीपासून संरक्षण व्हावे, यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत रात्रीच्या सुमारास बेघर बांधवांना मनपाच्या बेघर निवारा गृहात आणण्यात येऊन त्यांची व्यवस्था करण्यात येत आहे.  महाराष्ट्रामध्ये हिवाळ्यात थंडीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरी बेघरांना थंडीपासून संरक्षण उपलब्ध करून देण्यात यावे, यासाठी नागरी भागातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!