संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– भदंत ससाई यांच्या नेतृत्वात भीम चौक ते संविधान चौक
– पंचशील ध्वज, निळी टोपी आकर्षण
नागपूर :- हातात पंचशील ध्वज अन् डोक्यावर निळी टोपी, पांढरे वस्त्र घातलेले आंबेडकरी अनुयायी प्रचंड घोषणा देत शांती मार्चमध्ये सहभागी झाले. कामठी मार्ग आणि संविधान चौक उपासक, उपासिकांच्या घोषणांनी दणाणून गेला. बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या हाती द्या, या मागणीसाठी महाबोधी महाविहार मुक्तीचे प्रणेते व धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात रविवार, 16 मार्च रोजी सकाळी भीम चौक, जरीपटका येथून शांती मार्च काढण्यात आला.
बोधगया हे जगातील सर्व बौद्धांचे पवित्र स्थान आहे. या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांना संबोधी प्राप्त झाली होती. या महाविहाराची निर्मिती सम्राट अशोक यांनी केली होती. त्यामुळे महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या हाती द्यावे, या मागणीसाठी अ. भा. धम्मसेना, महाबोधी भिक्खू-भिक्खूनी महासंघ, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, समस्त बुद्धविहार समिती तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने हा शांती मार्च काढण्यात आला. बुद्धवंदना घेतल्यानंतर शांती रॅलीला सुरुवात झाली.
जरीपटका मार्गाने निघालेला शांती मार्च इंदोरा चौकात आल्यानंतर भिक्खू संघावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. गुलाब फुलांच्या पाकळ्यांनी भिक्खु संघाचे स्वागत करण्यात आले. शेकडो पंचशील ध्वज झळकत होते. निळी टोपी घातलेले अनुयायी घोषणा देत मार्गक्रमण करीत होते. दहा नंबर पूल, कडबी चौक, एलआयसीनंतर संविधान चौकात शांती मार्च पोहोचला. यावेळी भदंत ससाई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. सामूहिक बुद्धवंदना घेतल्यानंतर त्यांनी उपासक, उपासिकांना मार्गदर्शन केले. शांती मार्चमध्ये आयोजक गौतम अंबादे, हिमांशू उके, अर्चना राळे, वर्षा बोरकर, श्रुती उके, अमन मेश्राम, निशांत इंदूरकर, अतांग कराडे, अक्षय खोब्रागडे यांच्यासह भिक्खू संघ, हजारो आंबेडकरी कार्यकर्ते, उपासक-उपासिका, बुद्धविहार समिती सदस्य, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी शांती मार्चमध्ये सहभागी झाले होते.
1992 पासून आंदोलनाला सुरुवात : भदंत ससाई
भदंत ससाई यांनी महाबोधी विहार आणि आंदोलनासंबंधीचा इतिहास सांगितला. त्यावेळी महाविहारासंदर्भात फारशी लोकांना माहिती नव्हती, जनजागृती करीत महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाला सुरुवात केल्याचे ससाई यांनी सांगितले. 1992 पासून तब्बल 18 टप्प्यांत आंदोलन करण्यात आले. बिहार, पटना, बुद्धगया, दिल्ली आदी ठिकाणी सतत आंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आंदोलनाला देश, विदेशातून लाखो उपासक, उपासिकांनी सहकार्य केले. आजचा शांती मार्च आणि सहभागी अनुयायांना पाहून आंदोलनाची धग कायम असल्याचे दिसते. शांती मार्चमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक अनुयायाचे त्यांनी मनापासून आभारही मानले.